मुंबई प्रतिनिधी | राज्य सहकारी बँकेच्या अनियमित कर्ज वाटपामुळे झालेल्या २५ हजार कोटी रुपयांच्या भष्टाचार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांना हा आजपर्यंतच्या राजकीय जीवनात मिळालेला सर्वात मोठा धक्का असल्याचे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे.
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आले होते. या प्रकरणी एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायलयाने आर्थिक गुन्हे शाखेला यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अजित पवार यांचे नाव याआधीच या प्रकरणात आले होते. त्याच त्यानंतर शरद पवार यांचे नाव आज या प्रकरणी जोडले गेल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. तर या मुद्द्याने विधानसभेच्या राजकारणात चांगलेच रान तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२५ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात अनेक मात्तबर नेत्यांची नावे आली असून शरद पवार , अजित पवार यांच्या व्यतिरिक्त अन्य ५० जण या घोटाळ्याचे आरोपी आहेत. दिलीपराव देशमुख, ईशरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलवडे, आनंदराव अडसूळ या नेत्यांची नावे याघोटाळ्यात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल करण्याची कारवाही केल्यानंतर आता ईडी पुढील पाऊल काय उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.