महाराष्ट्रात पुन्हा शाळा बंद होणार?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सध्या वाढत असलेल्या ओमिक्रोनबाबत राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. नुकतीच शाळांनाही परवानगी देत सुरुवात करण्यात आली आहे. अशात आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा शाळा बंद करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. “सध्या ओमिक्रोनचे रुग्ण वाढत आहेत. त्याचं देखील निरीक्षण सुरू आहे. त्यामुळेच आम्ही ऑनलाइन शिक्षण चालू ठेवलं आहे. ओमिक्रॉन मुळे शाळा बंद करण्याचा निर्णय सध्यातरी घेतलेला नाही. मात्र, राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू केल्यानंतर आता त्या पुन्हा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, देशात सध्या ओमिक्रोनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे प्रकार घडत आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ज्या शाळांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थी आढळून आले आहेत, त्या शाळेंबाबत संबंधित शिक्षण अधिकारी निर्णय घेत आहेत.

देशातील एकूण 213 ओमिक्रॉन प्रकरणांपैकी महाराष्ट्रात 54 रुग्णांची नोंद केली गेली आहे. ओमिक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. दरम्यान, काही राज्यांमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले असल्याचे यावेळी मंत्री गायकवाड यांनी सांगितले.