बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सध्या देशात ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मुले जास्तीत जास्त वेळ मोबाइल वापरण्यात आणि सोशल मीडियावर घालवत आहेत. अशाच एका मोबाइलच्या आहारी गेलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला मोबाइलचा वापर कमी कर, अभ्यासात लक्ष दे! असे म्हणणे त्याच्या वडिलांच्या जीवावर बेतले आहे. या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या पित्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
मृत वडिलांचे नाव गजानन संपत गवई आहे. ते बुलडाणा शहरातील समतानगर परिसरात राहतात. मृत गजानन गवई यांचा मुलगा शुभम अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याला मोबाइल आणि सोशल मीडियाचे मोठ्या प्रमाणात व्यसन जडले होते. त्याला आई वडिलांनी अभ्यास कर, मोबाइल कमी बघ, असं म्हटले कि तो सारखा चिडचिड करायचा. याच रागातून त्याने वडील गजानन गवई यांची धारदार कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हा हल्ला झाल्यानंतर गवई यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण अधिक रक्तप्रवाह झाल्याने त्यांचा रुग्णालयात जाण्याअगोदरच मृत्यू झाला आहे. मृत गवई हे अमडापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते आपली पत्नी आणि मुलगा शुभमसह एकत्र राहात होते. मृत गवई यांचा शुभम हा एकुलता एक मुलगा होता. त्यांना अन्य चार मुली असून त्यांची लग्ने झाली आहेत. आरोपी मुलगा शुभम हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मागच्या काही वर्षांपासून आरोपी शुभमवर मानसिक उपचार केले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभमला अटक करून या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.