हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान जन धन योजना देशभरातील सर्व कुटुंबांना बँकिंग सुविधा देण्यासाठी सुरू केली गेली आहे. ज्याअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला बँकेत खाते उघडण्याची संधी देण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. मात्र, याची प्रत्यक्ष सुरूवात ही २८ ऑगस्ट २०१४ रोजी झाली होती. या योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडण्यापासून वंचित असलेल्या लाखो लोकांनी विविध बँकांमध्ये आपली खाती उघडली. या खातेदारांना आता त्याचा लाभही मिळत आहे. सरकारी योजनांमधील पैसा थेट त्यांच्या जनधन खात्यामध्ये जमा केला जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नुकत्याच राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊन दरम्यान, सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कोट्यावधी महिलांच्या खात्यात तीन महिन्यांकरिता ५००-५०० रुपये जमा करत आहे. याचा थेट फायदा गरिबांना होत आहे. याशिवाय जन धन खाते उघडणाऱ्यांना मोफत जीवन विमा आणि अपघात विमा संरक्षणही मिळणार आहे. परंतु यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. नाहीतर, आपल्याला याचा लाभ मिळणार नाही.
जन धन खात्यास हे विमा संरक्षण मोफत मिळते
सर्व खातेधारकांना जन धन योजनेंतर्गत दोन लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळते. रुपे डेबिट कार्डवरील या मोफत अपघाती विम्याची मर्यादासुद्धा दोन लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. यापूर्वी एक लाख रुपयांचा अपघाती विमा मिळण्याची सुविधा होती.
जनधन खात्यावर ३०,००० रुपयांचे जीवन विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. जीवन विमा खातेधारकाच्या मृत्यूच्या वेळी, विम्याचे पैसे हे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिले जातात. मात्र या विनामूल्य विमा संरक्षणासाठी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे
आपण पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत खाते उघडल्यास सुमारे ९० दिवसांपर्यंत या खात्यामधून व्यवहार करणे आवश्यक आहे. जन धन विमा नियमांनुसार, अपघात होण्यापूर्वी ९० दिवसांपूर्वी आपल्या खात्यातून काही व्यवहार होणे आवश्यक आहे. बँक खाते, एटीएम, ई-कॉमर्स किंवा पॉईंट ऑफ सेल इत्यांदीशी व्यवहार करणे आवश्यक आहेत.
इतरही काही फायदे
रूपे डेबिट कार्ड सुविधाही मिळेल. हे जन धन खाते कोणत्याही बँकेत उघडता येते. यासाठी कोणतीही मिनिमम मंथली बॅलेन्सची आवश्यकता नाही. व्याज दर हा इतर बँकांमधील बचत खात्याच्या व्याज दराइतकाच आहे.
ओव्हरड्राफ्टचीही सुविधा
या जन धन योजनेंतर्गत आपल्याला ओव्हरड्राफ्टही मिळू शकतो. हे जन धन खाते उघडल्यानंतर ६ महिन्यांनी आपल्याला हा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट मर्यादेची मर्यादा पूर्वी ५,००० रुपये निश्चित करण्यात आली होती. नंतर मात्र ती दहा हजार रुपये करण्यात आली. आता जनधन खातेधारक वयाच्या ६५ वर्षांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा घेऊ शकतात, पूर्वी ही वयोमर्यादा १८ ते ६० वर्षे होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.