Sunday, May 28, 2023

आधी व्यापाऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका मग लॉकडाऊन करा : चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट बनत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार आहे. तशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलीय. त्यावर भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करु, पण आधी राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट असणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करा. अगोदर व्यापाऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका मग लॉकडाऊन करा. भाजपचा लॉकडाऊनला विरोध नाही, अशी भूमिका भाजपनं मांडली आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी मुख्यमंत्र्यानी सर्वपक्षीय बैठक घेतली. यानंतर भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. जनतेची, व्यापाऱ्यांची भावना लक्षात घ्यायला हवी. त्यांचं मागील वर्ष वाया गेले. कर, वीज बिल, कर्जाचे हप्ते भरावे लागले. त्यामुळे जीवन जगायचं कसं असा प्रश्न जनतेसमोर आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक मांडलं आहे. त्याचबरोबर कोरोना रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील हे पाहावं लागेल. रेमडेसिव्हीर कसं उपलब्ध होतील हे पाहिलं पाहिजे, असंही फडणवीस यांनी मत मांडले आहे.

आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवायचा असेल तर कडक लॉकडाऊन करावा, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका दिसतेय. देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरलाय, लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या घटकांचा काय विचार केलाय, याबाबत प्लॅन केला नाहीत तर उद्रेक होईल, असं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा मान्य केला. अजित पवार यांनी सोमवारी हातावरती पोट असणाऱ्यांसाठी काय पॅकेज देता येईल, याबाबत विचार करु, असं म्हटलं आहे. पण त्यांनी एक अडचण सांगितली. ती अडचण बरोबर नाही. याबाबत नेमक्या संख्या नसतात. तर सगळे रिक्षाचालक, टॅक्सीचालक, घरकाम करणारे, फुटपाथविक्रेते रजिस्टर असतात. सगळे कामगार रजिस्टर असतात. त्यामुळे प्रश्न पडण्याचं काही कारण नसतं. इच्छाशक्ती असलं तर सगळं शक्य होतं”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.