पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे लोहमार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत प्राण्यांची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये त्यांनी दोघांना अटक करत त्यांच्याकडून आफ्रिकन जातीचे 279 कासव, 230 मासे अन् 1200 सरडे जप्त केले आहेत. या प्रकरणात पुणे लोहमार्ग पोलिसांनी तरुणकुमार मोहन आणि श्रीनिवास कमल यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना चेन्नई एलटीटी एक्सप्रेस या रेल्वे गाडीतून प्राण्यांची तस्करी होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हि गाडी पुणे रेल्वे स्थानकात येताच गाडीची झडती घेण्यात आली. यावेळी त्यांनी दोघा संशयितांना पकडून त्यांच्याकडील सामानांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 279 कासव, वेगवेगळ्या जातीचे 1207 सरडे आणि 230 मासे जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून चार पथके तयार करून येणाऱ्या-जाणाऱ्या गाडीची तपासणी करण्यात आली. मंगळवारी पोलिसांच्या पथकाने पुणे ते लोणावळा दरम्यान चेन्नई एलटीटी एक्सप्रेस गाडीत 2 संशयितांना पकडले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचा परवाना आणि कागदपत्रे नव्हती. त्यानंतर त्यांनी हे सर्व प्राणी चेन्नई येथून मुंबई येथे घेऊन जाणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर या दोघांना सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक मौला सय्यद, कर्मचारी सुनील भोकरे, जगदीश सावंत यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे.