एकेकाळी भजी विकणारा मुलगा पुढे जाऊन बनला धीरुभाई अंबानी; जाणुन घ्या जीवनप्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील जुनागढ शहराजवळच्या चोरवाड या छोट्याश्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. धीरूभाईंनी फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले होते, परंतु त्यांनी सिद्ध केले की अव्वल उद्योजक होण्यासाठी मोठ्या पदव्या घेणे आवश्यक नसते.

आपल्या भावासोबत काम करण्यासाठी ते १९५५ मध्ये येमेनमधील एडन येथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना पेट्रोल पंपावर सहाय्यक म्हणून पहिली नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांचा पहिला पगार होता फक्त ३०० रुपये ! काही काळानंतर धीरुभाई भारतात परतले आणि त्यांच्या गावाजवळच्या गिरनार पर्वतावर येणाऱ्या यात्रेकरूंना भजी विकून त्यांनी आपल्या व्यवसाय जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर पाच वर्षातच त्यांनी आपला एक चुलतभाऊ चंपकलाल दमानी याच्यासोबत १९६० मध्ये रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली. त्यांचे पहिले कार्यालय मुंबईतील मस्जिद बंदर भागातील नरसिनाथन स्ट्रीटमधील ३५० चौरस फुटांच्या खोलीत होते. त्यात दोन टेबल्स, ३ खुर्च्या आणि एक टेलिफोन होता.

केवळ ५० हजार रुपये आणि दोन सहाय्यकांच्या भांडवलावर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. आज केवळ मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजची बाजारपेठ ११ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांनी कंपनीचे नाव अनेकदा बदलले. आधी कंपनीचे नाव रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन असे नामकरण होते, ते बदलून रिलायन्स टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड आणि नंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यात आले.  १९८६ मध्ये रिलायन्स भारतातील पहिली अशी खासगी कंपनी बनली, जिला S&P, मूडीज सारख्या इंटरनेशनल क्रेडिट रेटिंग एजेंसींनी रेटिंग द्यायला सुरुवात केली.

वार्षिक सभा स्टेडियम मध्ये होणारी रिलायन्स ही पहिली कंपनी होती. १९८६ ला कंपनीच्या वार्षिक सभेत साडेतीन लाख लोक सहभागी होते. त्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय पेट्रोकेमिकल, टेलिकॉम, एनर्जी, पॉवर अशा अनेक क्षेत्रात विस्तारित केला. धीरुभाईंना १९८६ आणि २००२ साली असा दोन वेळा दोनदा ब्रेनस्ट्रोक आला. ६ जुलै २००२ रोजी त्यांचे निधन झाले. ‘गुरु’ हा हिंदी चित्रपट धीरूभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारित आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.