हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाशिममधील गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने या प्रकरणावरून सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज अजित पवारांनी विधानसभा सभागृहात या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करत संताप व्यक्त केला आहे.
अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूलराज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी वाशिममधील गायरान जमीन बेकायदेशीररित्या विकली. तब्बल दीडशे कोटींची किंमत असलेली 37 एकर जमीन त्यांनी कवडीमोल भावाने एकाला विकली. कोर्टानेही या प्रकरणात संबंधित मंत्री दोषी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
“मौजे घोडबाभूळ, तालुका/जिल्हा वाशिम येथील सरकारी गायरान जमीन गट नं 44 मधील 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. याची किंमत काढली तर तो दीडशे कोटींचा आहे. गायरान जमिनी कुणाला देता येत नाही, याबद्दल सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्याचं पालन आपण करतो . मात्र योगेश खंडारे नावाच्या व्यक्तीने जिल्हा न्यायालयात मागणी केली होती. जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली होती. ती मागणी फेटाळताना खंडागळेंचा या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. सरकारी जमीन हडप करण्याचा त्याचा इरादा होता, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.
मात्र त्यावेळी तत्कालीन महसूलराज्यमंत्र्यांनी 17 जून 2022 रोजी 37 एकर गायरान जमीन योगेश खंडारे या व्यक्तीला वाटप देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचा उल्लंघन करणारा होता. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने गंभीर निरीक्षण नोंदवलं. तत्कालिन महसूल राज्यमंत्री (अब्दुल सत्तार) यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असूनही राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. राज्यमंत्र्यांनी पदाचा पूर्णपणे दुरूपयोग केला असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अजित पवारांनी केली .