हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही. ज्या पद्धतीने मराठी, तेलगू, कन्नड भाषा आहेत, तशीच हिंदी आहे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं (Vishwa Marathi Sammelan) आयोजन करण्यात आलं आहे यावेळी राज ठाकरेंनी भाषेबाबत महाराष्ट्रातील लोकांना जागृत केलं. तसेच मराठीतच बोला असं आवाहनही केलं.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील कोणत्याही शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्यावेळी हिंदी भाषा कानावर येते त्यावेळी मला त्रास होऊ लागतो. माझा भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम आहे पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नाही. जशी मराठी, तमिळ, तेलगु, गुजराती भाषा आहेत, तशीच हिंदीसुद्धा भाषा आहे. या देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही, राष्ट्रभाषा म्हणून कोणतीही भाषा नेमली गेलीच नाही असं परखड मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले, हिंदी चित्रपटांमधून आमच्या अंगावर हिंदी आली. पण बोलताना मराठी लोक हिंदी का वापरतात? तुम्ही जेव्हा आंध्रप्रदेश, तामिळनाडू किंवा बंगालमध्ये जाता तेव्हा ती लोक हिंदी बोलतात का? मग महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी का बोलत आहात? असा सवालही राज ठाकरेंनी केला.
मराठी बोला
राज ठाकरे पुढे म्हणाले, आपली मराठी भाषा सर्वात उत्तम आणि समृद्ध भाषा आहे. परंतु आज मराठी भाषा घालवण्याचा राजकीय प्रयत्न होत आहे. त्यामुळे ते माझी तळपायाची आग मस्तकात जाते. आता कोणीही समोर येऊ द्या, आपण मराठीच बोला. शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा अनिर्वाय करा. तुम्हाला जी भाषा शिकायची ती शिका, जर्मन, फ्रेंच. सर्व भाषा शिका…. पण जिथं राहताय ती भाषा प्रथम शिका. त्यात कसला कमीपणा आणू नका असे आवाहन राज ठाकरेंनी केलं.