”आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं”; संजय राऊतांचा मोदींना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोक ढोल वाजवत रस्त्यावर आले. आता आग लावली नाही म्हणजे झालं,’ अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. तसेच इव्हेंट करण्यापेक्षा जनतेच्या पोटापाण्याबद्दल बोलण्याचं आवाहनही संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजून ९ मिनिटाला पूर्ण देशवासियांना घरातील लाईट्स बंद करून मेणबत्या आणि दिवे पेटवण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या या आवाहनावर विरोधकांनी टीका केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ट्विटरवर पंतप्रधानांच्या आवाहनाची खिल्ली उडवली आहे. ”टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर उतरून ढोल वाजवले होते. आता आग नाही लावली म्हणजे झालं, कामाचं बोला आणि लोकांच्या पोटापाण्याचं बोला, असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना संकटाचाही इव्हेंट करायचा आहे, अशी टीका करतानाच रविवारी मी मेणबत्ती पेटवणार नाही आणि घरातील लाइटही बंद करणार नाही, असं म्हटलं आहे. तर आम्हाला वाटलं होतं पंतप्रधान चुली पेटवण्याचा संदेश देतील, पण साहेब दिवे जाळण्याचा उपदेश देऊन गेले, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. ‘थाळी-टाळीनंतर आता दिवे जाळण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. लोकांना दिवे लावायला सांगणं हे पंतप्रधानांचं काम आहे का?,’ असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

मोदींनी केलं होत हे आवाहन
देशभर हातपाय पसरलेल्या करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजही देशवासियांशी संवाद साधला. ‘रविवारी ५ एप्रिलला आपल्याला करोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून प्रकाशाची शक्ती दाखवून द्यायची आहे. यासाठी ५ एप्रिलला १३० कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. रविवारी रात्री ९ वाजता तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाइट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा. हे ९ मिनिटे करा’, असं आवाहन मोदींनी आज देशवासियांना केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार