मुंबई । आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विषयावर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मी पंतप्रधान असतो तर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) गुजरातऐवजी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगालसारख्या राज्यात नेलं असत. असं म्हणण्यामागे संजय राऊत यांनी त्यामागचे कारण सुद्धा या मुलाखतीत सांगितलं.
संजय राऊत पंतप्रधान मोदींच्या हेतुंवर प्रश्न उपस्थित करत म्हणाले कि, ”पंतप्रधान हे देशाचे असतात. त्यांना गृहराज्य असं काही नसतं. पक्षपाताची शंकाही येऊ नये असं त्यांनी वागणं अपेक्षित असतं. मी पंतप्रधान असतो तर वित्तीय सेवा केंद्र बिहार, उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगालसारख्या गरीब राज्यांमध्ये नेलं असतं. किमान ती राज्ये तरी जगाच्या नकाशावर आली असती. मोदींना हे करता आलं असतं,’ असं राऊत यांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला विरोध करताना म्हटलं.
भारतातील मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी आपलं मत मांडलं. ‘भाजपशी संलग्न संस्था, संघटना ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यातून धार्मिक अराजक निर्माण होऊ शकतं. देशात अशांतता आणि अस्थिरता माजू शकते. अशानं एखाद्याचं पंतप्रधानपद, मुख्यमंत्रिपद राहील, पण देश राहणार नाही. याचं भान ठेवलं पाहिजे,’ असंही ते म्हणाले. ‘मुस्लिमांमधील काही लोक देशविघातक काम करतात. तसे इतरही आहेत. पण त्यासाठी आपल्याकडं कठोर कायदे आहेत. नक्षलवादाविरुद्धही कायदे आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. हे कायद्याचं राज्य टिकवण्याची जबाबदारी मोदींची आहे. कोणाला चिरडून राज्य करता येत नाही,’ असं ते म्हणाले.
यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबरोबरच भाजपच्या कारभारावर परखड भाष्य केलं.’देशात गृहयुद्ध सुरू झालंय. ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते भयंकर आहे. प्रत्येक मुद्द्यावर कठोरपणे बोलत असल्यामुळं कदाचित उद्या मलाही अर्बन नक्षलवादी ठरवलं जाईल,’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”