क्रुझवरील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोपांचा सपाटाच लावला आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. मुंबई येथील क्रूझ पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया होता. तो आंतरराष्ट्रीय माफिया हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कदायक आरोप मलिक यांनी केलाय.

नवाब मलिक म्हणाले, त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची बंदुकधारी प्रेयसीही होती. जो तिथे नाचत असल्याचं दिसत आहे, तो दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे हे NCB च्या सर्वांना माहित आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, तो काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता. याची मैत्री वानखेडेंसोबतही आहे असा गंभीर दावा नवाब मलिक यांनी केला.

तसेच क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही समोर आणा, सगळं सत्य समोर येईल असं नवाब मलिक म्हणाले. प्रत्येक खोलीतलं फुटेज पाहावं. डान्सचं फुटेजही पाहावं. त्यानंतर जगातला एक मोठा ड्रग्जमाफिया तुम्हाला सापडेल. ही पार्टी त्यानेच आयोजित केली होती. तसेच समीर वानखेडे यांच्या मालदीव दौऱ्याची चौकशी व्हावी, असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय.