व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी शेवटपर्यंत उभा राहणार : जयंत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून बंड करत शिवसेनेला हादरा देण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेत त्यांच्यांशी चर्चाही केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “उद्धव ठाकरे हे आजही मुख्यमंत्री आहेत. आम्हाला खात्री आहे कि त्यांचे आमदार परत येतील आणि शेवटपर्यंत राष्ट्रवादी हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे,” असे म्हणत पाटील यांनी आश्वासन दिले.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार स्थापू झाले आणि आम्ही सत्तेवर आलो त्या अडीच वर्षाच्यापूर्वी परिस्थिती वेगळी होती. या काळात आम्ही चांगले निर्णय घेतले. मात्र, आज परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे. आम्ही घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे आम्हाला विरोधी पक्षात बसायची तयारी करावी लागत नाही.

आज उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलायचे झाले तर त्यांना कोणताही हव्यास नाही आहे. त्यांच्या पक्षातील आमदार जरी त्यांना सोडून गेले असले तरी ते परत येतील असा विश्वास आजही आम्हाला वाटत आहे. आजच्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार साहेबानी आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच्या सूचना, आवाहनानुसार आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत, असेही पाटील यांनी म्हंटले.