यशवंत जाधव उद्धव ठाकरेंचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर; सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सच्या धाडी पडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या वर पुन्हा एकदा आरोप केला. यशवंत जाधव म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर असल्याची टीका किरिटी सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, यशवंत जाधव पालिकेच्या कंत्राटदारांकडून रोख पैसे घ्यायचे. पालिकेच्या प्रत्येक कंत्राटातील ४० टक्के पैसे यशवंत जाधव यांना मिळायचे. हेच पैसे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून इतरत्र वळवले जायचे. यशवंत जाधव यांच्या या रोख व्यवहारांचा पुरावा आयकर विभागाच्या हाती लागल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला

यशवंत जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानं मुंबईकरांना लुटलं, हे शहर बरबाद केलं. त्यांच्यावर कारवाई व्हायला थोडा उशीरच झाला. यशवंत जाधवांचं उदाहरण शिवसेनेसाठी एक आदर्श आहे. म्हणूनच ज्या पद्धतीनं ते मनी लाँड्रिंग करतात. त्याच पद्धतीनं ठाकरे कुटुंबीयही त्याच मार्गावर गेले आहेत. अनिल परबही त्याच मार्गावर गेले आहेत, असं म्हणत सोमय्यांनी टीका केली.