शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या जखमी; रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे आज पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात असताना  काही शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावून गेले. या एकूण प्रकरणात सोमय्या जखमी झाले असून ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. आज ते जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी पुण्यात आले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या जमिनीवर पडले. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीने एकच गोंधळ उडाला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणा बाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करुन दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.