कोरोना प्रमाणेच बुबोनिक प्लेगवरही WHO चीनसोबत, म्हणाले,” ते चांगले काम करत आहेत”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या अंतर्गत मंगोलियामध्ये बुबोनिक प्लेगच्या उघडकीस आलेल्या घटनेनंतर जगभरात पुन्हा एकदा एक नवीन साथ येण्याची भीती निर्माण झाली आहे. उंदरामुळे पसरणाऱ्या या प्लेगला, ‘ब्लॅक डेथ’ असे म्हणूनही ओळखले जाते. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, ते चीनमधील या ब्यूबोनिक प्लेगवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की,’ याक्षणी ही परिस्थिती ‘अधिक धोकादायक’ नाही आणि चीनने हे प्रकरण अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले आहे.’

डब्ल्यूएचओचे प्रवक्ते मार्गारेट हॅरिस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “चीन आणि मंगोलिया प्रशासनासह एकत्रितपणे आम्ही या गोष्टीवर सतत नजर ठेवतो आहोत. आत्ता आम्हाला असे वाटत नाही की, या बुबोनिक प्लेगचा जास्त धोका आहे मात्र तरीही याबाबत सावधगिरीने निरीक्षण केले जात आहे आणि सध्यातरी यामध्ये घाबरण्यासारखे असे काहीही नाही. या बुबोनिक प्लेगमुळे लिम्फनोड्समध्ये जळजळ होते. सुरुवातीला हा रोग ओळखणे अवघड आहे कारण त्याची लक्षणे ही तीन ते सात दिवसांनंतर दिसतात आणि इतर कोणत्याही फ्लूसारखीच असतात. नोव्हेंबर 2019 मध्ये अशी 4 प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये या प्लेगचे 2 धोकादायक प्रकार आढळून आले. त्याला न्यूमोनिक प्लेग असे म्हणतात.

चीनच्या अंतर्गत भागातील मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील एका शहरात ब्यूबोनिक प्लेगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. एका वृत्तानुसार, बयानूर शहरात आढळलेला याचा रुग्ण हा एक मेंढपाळ असून त्याला आयसोलेट ठेवण्यात आलेले आहे. मंगोलियामध्ये असलेल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितले की असे मानले जात आहे की मार्मोटचे कच्चे मांस आणि किडनी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मार्मॉट्स हे या प्लेगच्या बॅक्टेरियाचे वाहक आहेत तसेच त्यांची शिकार करणे बेकायदेशीर आहे.

‘ब्लॅक डेथ’ म्हणून ओळखला जाणारा ब्यूबॉनिक प्लेग म्हणजे नक्की काय आहे ?
डब्ल्यूएचओच्या मते, हा एक अत्यंत संक्रमक रोग आहे जो येरसिनिया पेस्टिस नावाच्या बॅक्टेरियामुळे पसरतो. हा जीवाणू उंदीरच्या शरीरावर चिकटलेल्या परजीवी पिसवांमध्ये आढळतो, हा एक प्राणघातक रोग आहे. या प्लेगचे सहसा दोन प्रकार असतात – न्यूमोनिक आणि ब्यूबोनिक. सुरुवातीच्या संसर्गास ब्यूबॉनिक प्लेग असे म्हणतात, परंतु जेव्हा हे जिवाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात तेव्हा स्थिती अधिक गंभीर होते आणि ती न्यूमोनिक प्लेगमध्ये बदलते. उंदीरच्या शरीरावर असलेल्या पिसवांमुळे या प्लेगचा रोग पसरतो. जे लोक या प्लेगच्या रूग्णाच्या श्वास आणि थुंकीच्या संपर्कात येतात त्यांनाही या प्लेगचा विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.

या प्लेगची लक्षणेही कोरोना संक्रमणासारखीच आहेत. या काळात ताप, थंडी वाजून येणे, शरीरावर वेदना, अशक्तपणा, उलट्या यासारखी लक्षणे दिसून येतात. ब्यूबोनिक प्लेगमुळे लिम्फ ग्रंथीला सूज येते आणि ताप येतो, तर न्यूमोनिक प्लेगमध्ये संसर्गामुळे श्वासोच्छवासासह खोकला होतो. ब्यूबोनिक प्लेगमध्ये मृत्यूचा धोका हा 30 ते 60 टक्के असतो, तर न्यूमोनिक प्लेगच्या बाबतीत, योग्य ते उपचार न घेतल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. स्ट्रेप्टोमाइसिन आणि टेट्रासाइक्लिन सारख्या औषधांद्वारे यावर प्रभावीपणे उपचार केला जाऊ शकतो. कोरोना प्रमाणेच हा प्लेग एका संक्रमित व्यक्तीपासून दुसऱ्या ठिकाणी ड्रॉपलेट्स मधून पसरतो. रुग्णाच्या मृत्यूनंतरसुद्धा जेव्हा त्याच्या शरीराशी संपर्क येतो तेव्हाही याचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment