कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची श्रेणी जाहीर केली असून, त्यात देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांच्या यादीत कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने स्थान पटकाविले आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था या गटामध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट 50 संस्थांमध्ये गणले गेले असून, महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कृष्णा अभिमत विद्यापीठाने अवघ्या 15 वर्षांच्या कालावधीत नावारूपाला येत, देशातील ‘टॉप १००’ विद्यापीठांमध्ये स्थान पटकाविल्याने कृष्णा विद्यापीठाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
केंद्रीय मन्युष्यबळ विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) यादी तयार केली जाते. त्यानुसार सन 2020 सालातील देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची व शैक्षणिक संस्थांची यादी केंद्रीय मन्युष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे जाहीर केली.
देशात सुमारे 800 हून अधिक विद्यापीठे आहेत. यामध्ये कृष्णा विद्यापीठातील अध्यापन पद्धती व संसाधने, संशोधन कार्य व व्यावसायिक प्रॅक्टिस, सर्वसमावेशकता व सामाजिक उत्तरदायित्व इत्यादी निकषांच्या आधारे देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाचा समावेश झाला आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठ देशात 90 व्या स्थानी आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण या विभागात देशातील सर्वोत्कृष्ट 50 वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या यादीत कृष्णा मेडिकल कॉलेज निवडले गेले असून, देशात 37 व्या स्थानी; तर महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानावर आहे.
या यादीमध्ये देशभरातील 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा असणारी विद्यापीठे असून, या विद्यापीठांच्या स्पर्धेत सहभागी होत, अवघ्या 15 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कृष्णा अभिमत विद्यापीठाने देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत स्थान पटकाविणे, ही विशेष उपलब्धी मानली जात आहे.
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कृष्णा वैद्यकीय शिक्षण संस्थेला 2005 साली अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता लाभली. विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा अभिमत विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात यशस्वी घोडदौड सुरू केली आहे. अत्याधुनिक शिक्षण प्रणालीचा वापर करत आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैद्यकीय शिक्षण दिले जात असल्याने, अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी कृष्णा विद्यापीठालाच पसंती मिळते. एकाच छताखाली उपलब्ध असलेली उच्च शैक्षणिक सुविधा आणि बहुवैशिष्टपूर्ण आरोग्य व रोगनिदान सेवा या वैशिष्ट्यांबद्दल कृष्णा अभिमत विद्यापीठाला यापूर्वीच ‘आयएसओ 9001 : 2008’ मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलमधील बालरोग विभागाच्या अतिदक्षता कक्षाला भारतीय राष्ट्रीय नवजात मंचाचे (नॅशनल निओनॅटल फोरम ऑफ इंडिया) मानांकन, रक्तपेढीला ‘एनएबीएच’ या राष्ट्रीय संस्थेचे मानांकन, रोगनिदान प्रयोगशाळेला ‘एनएबीएल’ मानांकल लाभले आहे. तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात येत आहे.
कृष्णा अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 1100 बेडच्या सुसज्ज कृष्णा हॉस्पिटलचे आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य असून, सध्याच्या कोरोना साथीच्या काळात या हॉस्पिटलने केलेली आरोग्य सेवा महाराष्ट्रात महत्वपूर्ण ठरली आहे. या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 177 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, या सर्वांनी कृष्णा हॉस्पिटलच्या मदतीने कोरोनावर मात केली आहे. तसेच कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ च्या चाचण्यादेखील केल्या जात आहे. याचबरोबर कोरोना लस संशोधन प्रकल्पात सहभागी झालेल्या देशभरातील निवडक 40 संस्थांमध्ये कृष्णा हॉस्पिटलचाही समावेश असून, या लस संशोधन प्रकल्पाचा लाभ संपूर्ण जगाला मिळणार आहे.
कृष्णा अभिमत विद्यापीठामार्फत सुरू असलेल्या या नाविण्यूपर्ण प्रकल्पांची आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सेवेची दखल यानिमित्ताने देशपातळीवर घेण्यात आली आहे. कराडसारख्या निमशहरी भागात कार्यरत असूनही, देशपातळीवर आपल्या कामाची मोहोर उमटविणाऱ्या कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सर्वोत्कृष्ट 10 विद्यापीठांमध्ये येण्याचा संकल्प
राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाचा समावेश होणे, ही आम्हा सर्वांसाठी आनंददायी गोष्ट आहे. ग्रामीण भागात आरोग्य शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने स्थापन झालेली ही संस्था अवघ्या 15 वर्षात देशातच नाही तर जगभरातही नावारूपाला येत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. येत्या काही वर्षात देशातील सर्वोत्कृष्ट 10 विद्यापीठांमध्ये येण्याचा आमचा संकल्प आहे.
– डॉ. सुरेश भोसले
कुलपती, कृष्णा अभिमत विद्यापीठ
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.