हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्व एअरलाइन्स कंपन्यांना आता आपल्या विमानातील मधली सीट प्रवासावेळी रिकामी ठेवावी लागणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर सिविल एविएशन रेगुलेटरी डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे. मात्र, यात काही प्रमाणात सूटही देण्यात आली आहे. नव्या गाइडलाइन्समध्ये एअरलाईन्सला आता आपल्या विमानातील मधली सीट रिकामी ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे. जर हे शक्य नसेल तर अशा परिस्थितीत मधल्या सीटवरील प्रवाशाला त्याचे संपूर्ण शरीर झाकले जाईल असा गाऊन द्यावा असे सांगण्यात आलेले आहे. मात्र हे गाऊन्स वस्त्रोद्योग मंत्रालयाने मंजूर केलेल्या मानकांनुसार असावे लागतील. एखाद्या प्रवासावेळी एकाच कुटुंबातील सदस्यांना एकत्र बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते. त्याशिवाय सर्व प्रवाशांना एअरलाइन्सकडून सेफ्टी किट देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ज्यामध्ये मास्क, फेस शील्ड आणि सॅनिटायझर पाउचचा समावेश असेल. या नवीन गाइडलाइन्स ३ जूनपासून लागू होतील.
प्रत्यक्षात प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि डीजीसीएच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने २६ मे रोजी याविषयी तज्ञांची एक समिती नेमली होती. या समितीने प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित सुरक्षेबाबतच्या प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाला आपल्या काही शिफारशी सुचवल्या. मधली जागा मोकळी सोडण्यासारख्या इतरही अनेक सूचना यामध्ये केल्या गेलेल्या आहेत. यामध्ये सर्व प्रवाशांना एअरलाइन्सद्वारे सुरक्षा किट प्रदान करणे हेदेखील समाविष्ट आहे. या किटमध्ये मास्क, फेस शील्ड आणि सॅनिटायझर (पाउच) यांचा समावेश आहे.
>> या शिफारसींमध्ये, कोणतेही गंभीर आरोग्याविषयीचे कारण असल्याशिवाय विमानात कोणत्याही प्रवाश्याला जेवण आणि ड्रिंक्स देण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. अनेक जणांना एकाचवेळी न घेता टप्प्याटप्प्याने प्रवाशांचे बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग करण्याची शिफारस केली आहे. तसेच विमानातील वातानुकूलन यंत्रणा अशा प्रकारे सेट करावी लागेल की कमीतकमी अंतराने हवा बदलली जाईल.
>> एअरलाइन्सला प्रत्येक प्रवासानंतर आपले विमान स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ट्रांजिट फ्लाइटमध्ये प्रवासी जेव्हा विमानात असतात तेव्हा फक्त रिकाम्या झालेल्या जागांचीच स्वच्छता केली जाईल. दिवसाच्या शेवटी प्रत्येक विमानाला पूर्णपणे स्वच्छ करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. विमानातील स्वच्छतागृहे पुन्हा पुन्हा स्वच्छ केली जातील याची काळजी घेण्यास सांगितले आहे. एअरलाइन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी केली जावी. या व्यतिरिक्त सर्व केबिन क्रूना पूर्ण गीअर प्रोटेक्टिव्ह सूट देण्याचे सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.