हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण हे काही बरोबर नाही. कर्नाटकच्या मुखयमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर केलेला दावा आणि दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबईत १७ डिसेंबरला सरकार विरोधात महामोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे भाई जगताप अशी दिग्गज नेतेमंडळी या पत्रकार परिषदेत उपस्थित होती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, जिजामाता उद्यान ते आझाद मैदान इथंपर्यंत हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा अपमान केलेल्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. न भूतो न भविष्य असा हा विराट मोर्चा असेल. महाराष्ट्राच्या शक्तीचं विराट दर्शन या महाराष्ट्र द्वेष्ट्याना दाखवलं पाहिजे त्यामुळे सर्व शिवछत्रपतीप्रेमींनी या मोर्चाला उपस्थित राहावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
महाविकास आघाडीचे चांगलं चाललेलं सरकार पडून गद्दारीचे सरकार महाराष्ट्रात आलं. हे सरकार आल्यानंतर काही गाव म्हणतात कर्नाटकात जायचं, काही गाव म्हणतात गुजरातला जायचं… छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडण्याचा डाव सुरु आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवली. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने राज्यातील उद्योग आता कर्नाटकला जाणार का? असा सवालही त्यांनी केला.