मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. तोदेखील वादळी स्वरूपाचा ठरला आहे. भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत भाजपची प्रतिविधानसभा बंद केली.
भाजपच्या आमदारांनी आज सकाळी सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली होती. या प्रतिविधानसभेचे अध्यक्ष कालीदास कोळमकर यांना करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या आमदारांनी माईक घेऊन भाषण देण्यास सुरुवात केली होती.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करावे, मात्र माईकाचा वापर करणे योग्य नाही, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावर आक्षेप घेतला होता. यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तातडीने भाजपची विधानसभा बंद करण्याचे आदेश सुरक्षाअधिकाऱ्यांना दिले. यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी भाजपच्या प्रतिविधानसभेत जाऊन माईक बंद पाडला आणि सभा घेण्यास मनाई केली. या कारवाईमुळे देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले.