फडणवीस आणि मला कुठलीही टोपण नावं ठेवता ते चालतं का? चंद्रकांतदादांचा प्रतिसवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. पडळकर यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राष्ट्रवादीने पडळकर यांच्या या वक्तव्याबाबत राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. तसंच पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. गोपीचंद पडळकरांच्या या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्रात चाललंय काय? माझ्याबद्दल कोणीही काहीही बोलतं. फडणवीस आणि मला कुठलीही टोपण नावं ठेवतात, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही अग्रलेखात काय लिहिता? जेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता, तुमच्या अग्रलेखाची भाषा काय असते?’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला आणि शिवसेनाला लगावला. ‘राजकारणामध्ये शब्द जपून वापरायला लागतात, कारण त्याची जखम खूप दिवस असते. गोपीचंद पडळकर यांचा शब्द चुकला, पण इतरांनी काहीही बोललेलं चालतं का?’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसंच सगळ्यांनीच राजकीय संस्कृती जपायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला.

गोपीचंद पडळकर समजूतदार कार्यकर्ते आहेत, शरद पवारांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिलं नाही, हा पडळकर यांचा अनुभव असेल. अनादर व्यक्त करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. फडणवीस यांनी शब्द जपून वापरण्याची समज पडळकर यांना दिली आहे,’ अशी सारवासारवही चंद्रकांत पाटील यावेळी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment