“महाराष्ट्रात आधी लस उपलब्ध करा मग राजकारण करा : देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्रात कोरोना लसीवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुपारी मी स्वत: केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. तीनच राज्यांना एक कोटी पेक्षा जास्त लसी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानला एक कोटी लसी देण्यात आल्यात. याउलट महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. तरीही तिथे कमी लस दिल्या गेल्या. खरंतर महाराष्ट्रातील परिस्थितीपासून लक्ष दूर करण्यासाठी प्रयत्न केला जातोय की काय अशी शंका निर्माण झालीय. राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर इंजेक्शन नाही. ही जबाबदारी तर राज्य सरकारची आहे. पण या विषयावर कुणीच बोलत नाही. हे आधी उपलब्ध करा. मग राजकारण करा”, असा प्रति टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला.

महाराष्ट्रात सध्या कोरोना लसीच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण तापलं आहे. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याचं आणि पुढील 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा सध्या शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांनी एकामागोमाग एक आठ ट्वीट करत ठाकरे सरकारच्या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात, मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते.” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

“स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहेत.” असेही जयंत पाटील म्हणाले. फडणवीसांनी बोलण्यापेक्षा लस मागविली असती तर बरे झाले असते, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. त्यानंतर फडणवीसांनी पुन्हा त्यास प्रतिउत्तर देत राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर इंजेक्शन नाही. ही जबाबदारी तर राज्य सरकारची आहे. पण या विषयावर कुणीच बोलत नाही. हे आधी उपलब्ध करा. मग राजकारण करा, असा टोला पाटील यांना लगावला.

Leave a Comment