“आशिषजी, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”; शिवसेना नेत्याचा थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी व शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी हिंदू सणांवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलारांनी टीका केल्यानंतर त्यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी शेलारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा शिवसैनिक तुम्हाला पळता भूई सोडणार नाही, असा इशारा कायंदे यांनी दिला आहे.

मनिषा कायंदे यांनी ट्विट करत शेलार यांना हा इशारा दिला असून त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “आशिष शेलार तुम्ही मा. मुख्यमंत्री यांच्याबद्दल तोंड सांभाळून बोलावे. अन्यथा शिवसैनिक तुम्हाला पळता भुई सोडणार नाही. आतापर्यंत कोरोना परिस्थिती बघूनच हिंदू सणांना मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील कोरोना कंट्रोलमध्ये राहिला, असे कायंदे यांनी म्हंटले आहे.

शेलार काय म्हणाले होते?

भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदू सणांवरून ठाकरे सरकारवर टीका केली. “मुंबई पोलीसांनी मुंबईत 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्‍यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्‍ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्‍ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्‍याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्‍याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्‍यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कमल लावण्‍यात आले आहे. मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्‍तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? असा सवाल शेलार यांनी केला.