मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही सीरिजसाठी मयंक अग्रवाल याची दोन्ही टीममध्ये निवड करण्यात आली आहे. मागचे वर्ष मयंक अग्रवालसाठी खूप निराशाजनक गेले आहे. यामुळे टेस्ट टीमच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये मयंकला जागा मिळणे कठीण झाले आहे. मयंकने करियरची चांगली सुरुवात केल्यानंतरसुद्धा त्याला थोड्या अपयशामुळे टीम इंडियामध्ये स्थान टिकवता आले नाही. त्यामुळे मयंक मानसिकदृष्ट्या अडचणीत आल्याचा धक्कादायक दावा त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक आर. एक्स मुरली यांनी केला आहे.
काय म्हणाले आर. एक्स मुरली
मयंक अजूनही पूर्णपणे मानसिक अडचणीतून बाहेर आलेला नाही असे मुरली यांनी सांगितले आहे. मयंक अग्रवाल सध्या मुंबईत बीसीसीआयच्या बायो-बबलमध्ये आहे. 2 जूनला तो टीम इंडियासोबत इंग्लंडला रवाना होणार आहे. ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मयंकला स्वत:वरच संशय यायला लागला. सगळं काही आपल्या विचारांवर अवलंबून असतं. जर काहीच योग्य होत नसेल, तर तुमच्या डोक्यात दोन प्रकारच्या गोष्टी येतात. तुमचं मानसिक संतुलन बिघडायला सुरुवात होते. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर संशय घेता. मयंकसोबतही हेच झालं,’ असेदेखील आर. एक्स मुरली म्हणाले.
‘प्रत्येक खेळाडूमध्ये घबराट असते, तुम्ही यशापेक्षा अपयश जास्त बघता. जेव्हा अपयशाचा विचार डोक्यात आला तरी तुम्ही घाबरता आणि टीममध्ये खूप स्पर्धा आहे, हे तुम्हाला दिसते तेव्हा तुम्ही प्रक्रियेतून बाहेर पडता. ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर मयंकने आपल्या मानसिक स्थितीवर काम केले आणि त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत जबरदस्त पुनरागमन केले अशी प्रतिक्रिया आर. एक्स मुरली यांनी दिली आहे. मयंक अग्रवालने यंदाच्या आयपीएलमध्ये 140 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 7 मॅच मध्ये 260 रन केले होते. इंग्लंड दौऱ्याआधी मयंकने आपला फॉर्म सुधरावला आहे. त्यामुळे आता मयंकला इंग्लंड दौऱ्यात संधी मिळते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.