मुंबई । राज्यात दूध दरवाढ आंदोलनावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. दूध दरांसाठी भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलनही करत होते. पण, त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं ही बाब अधोरेखित करत भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही असं थोरात म्हणाले.
महाविकासआघाडी सरकारनं मागील ४ महिन्यांपासून दूध दराच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे असं म्हणत थोरात यांनी भाजपला मात्र आंदोलनाचा अधिकार नाही, हीच बाब उचलून धरली. तेव्हा आता थोरातांचा हा टोला आणि त्यांनी अधिकारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षाची काय भूमिका असणार याकडे अनेकांचं लक्ष असेल.
दरम्यान, सोमवारी दूध आंदोलनाला सुरुवात झाली. अकोला, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली. दुधाला प्रति लीटर ३० रुपये भाव द्या, केंद्रानं घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तात्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर १० रुपये अनुदान वर्ग करा या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी संतप्त आंदोलक शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”