जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येताना… राज यांचे योगींना जोरदार प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । यापुढे महाराष्ट्राला किंवा इतर राज्यांना उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. योगी यांनी या नव्या नियमांसंदर्भातील माहिती पत्रकारांशी बोलताना दिली होती. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या पोस्टमधून यासंदर्भात आपले मत मांडताना राज म्हणाले, “उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं,” असं म्हटलं आहे.

याचबरोबर योगी यांनी दिलेल्या इशाऱ्यावर राज यांनी महाराष्ट्र सरकारलाही सल्ला दिला आहे. “महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा,” असं राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.facebook.com/RajThackeray/posts/814573852407099

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार असल्याचे सांगितले आहे. “कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची गरज असेल तर त्या राज्याला आधी या कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल. आमच्या परवानगीशिवाय त्यांना राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही. काही राज्यांनी ज्या पद्धतीने या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती योगी यांनी दिली. योगी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment