हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. दरेकर यांना सोमवार पर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर प्रवीण दरेकरांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. त्याची आज सुनावणी होती. पण या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. सरकारी वकील अन्य खटल्यांमध्ये व्यग्र असल्याने सोमवारची वेळ मागितली आहे. दरेकरांना सोमवारपर्यंत अटक करु नये, असा आदेश सत्र न्यायालयाने आज मुंबई पोलिसांना दिला आहे.
काय आहे प्रकरण –
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दरेकर हे मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून संचालक निवडून आले आहेत. २०१६ मध्ये विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या शपथपत्रात त्यांनी त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचे नमूद केले आहे. यावरुन दरेकर यांनी १९९९ पासून प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेतर्फे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर मजूर मतदारसंघातून २०२१ पर्यंत संचालक व अध्यक्षपद भूषविले. त्याचवेळी विधान परिषदेच्या शपथपत्रात मजूर असल्याची माहिती दडवून स्वतंत्र व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.