हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम मनीलॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर त्यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी नवाब मलिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा असल्याचे सांगत ईडीच्या कारवाई विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळून लावली.
अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी करण्यात आलेल्या कारवाई तसेच ईडीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी मलिक यांनी आपल्याला झालेली अटक ही बेकायदा असून, तत्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भातील निकाल राखून ठेवला होता. आज त्यावर सुनावणी घेत निर्णय दिला.
मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने आठ तास चौकशी केली. यानंतर त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मलिक यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून, यावर मंगळवारी निकालपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला होता.