सेंट्रींग कामगाराचा डोक्यात दगड घालून खून; पँट मृतदेहापासून बाजूला सापडली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | इस्लामपूर-कापूसखेड मार्गावर दोन नंबर टेकडीजवळ मदिना कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर राजेश सुभाष काळे या सेंट्रीग कामगाराचा डोक्यात दगड घालून निघृण खून करण्यात आला. रविवारी रात्री झालेला खूनाचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या खून प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गतीने तपास सुरू होता. मात्र पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती आले नव्हते.

इस्लामपूर-नेहरूनगर परिसरात राजेश काळे हा पत्नीसह वास्तव्यास आहे. दोघे पती-पत्नी सेंट्रींग कामातून उदरनिर्वाह करत होते. राजेश हा आईसोबत कराड येथे कामानिमित्त गेला होता. आईला पेठ येथे माहेरी सोडून तो इस्लामपूर शहरात आला. परंतू तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. सोमवारी सकाळी इस्लामपूर – कापूसखेड रोडवरील 2 नंबर टेकडीजवळ मदिना कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर राजेश काळे याचा मृतदेह पडला होता. अज्ञात इसमाने राजेशच्या चेहर्‍यावर व डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले.

राजेशची पँट मृतदेहापासून बाजूला पडली होती. थोड्याच अंतरावर एक रक्ताने माखलेला सिमेंटचा दगड, गुलाबी पिशवी, काळ्या रंगाच्या चपला व पांढर्‍या रंगाची पेन्सिल दिसून आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पथकाला तपासाच्या सुचना दिल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.