अमर जवान ज्योत विझवून मोदी सरकारकडून वीर जवानांचा घोर अपमान; नाना पटोलेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमर जवान ज्योत हि दिल्लीतील इंडिया गेटची ५० वर्षांपासून ओळख बनलेली आहे.मात्र, हि ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हलविण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या संघ विचाराच्या सरकारला जवानांच्या बलिदानाची, शौर्याची व त्यागाची महती कशी कळणार? हि ज्योत विझवून मोदी सरकारने वीर जवानांचा अपमान केला असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीतील अमर जवान ज्योत हलवण्याच्या निर्णयावरून मोदी सरकावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “अमर वीर जवानांचा जो गौरवशाली इतिहास आहे तो पुसण्याचा कृतघ्नपणा भाजपा सरकार करत आहे. ‘अमर जवान ज्योत’ विझवण्यासाठी देण्यात आलेले कारणसुद्धा अत्यंत तकलादू व बालिशपणाचे आहे.

आरएसएस व भारतीय जनता पक्षाचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व देशाच्या जडणघडणीत काडीचेही योगदान नाही. ते नेहरू गांधी यांचे योगदान नाकारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. भाजपा सरकारने आज ‘अमर जवान ज्योत’ विझवली तरी देशवासियांच्या मनात ती कायम तेवत राहील,” असेही पटोले यांनी म्हंटले.

इंदिराजी गांधी यांनी 1971 साली पाकिस्तानला धडा शिकवत दोन तुकडे केले व जगाच्या नकाशावर बांग्लादेशाची निर्मिती केली. या युद्धात शहीद जवानांच्या शौर्याचा इतिहास सांगणारी ‘अमर जवान ज्योत’ विझवून त्यांचे योगदान पुसण्याचे पातक संघ विचाराचे सरकार करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

भारत-पाक युद्धातील शहीद जवानांचे स्मारक

1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या 3 हजार 843 भारतीय जवानांच्या स्मरणार्थ ही इंडिया गेट बांधले गेले. तिथे प्रथम 1972 मध्ये ज्योत प्रकाशित झाली होती. यानंतर 26 फेब्रुवारी 1972 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ज्योतीचे उद्घाटन केले होते. केंद्र सरकारने 2019 मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले होते. 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या 26 हजार 466 भारतीय जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. 25 फेब्रुवारी 2019 ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.