हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. एक इंचही बांधकाम बेकायदेशीर नाही. मात्र, मातोश्रीच्या सांगण्यावरूनच नोटीस पाठवून तक्रार करण्यात आली,” अशी टीका राणे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेने पाठविलेल्या नोटिसीबाबत खुलासा केला. यावेळी ते म्हणाले की, मी मुंबईतील घेतलेल्या माझ्या जुहूच्या घरात 17 सप्टेंबर 2009 मध्ये आलो. 14 वर्ष झाली मी या घरात राहत आहे. ही इमारत बांधल्यानंतर 1991च्या डीसी रुलप्रमाणे इमारत बांधली आणि पजेशन देण्यात आले. मी एक इंचही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. आणि तशी मला काही आवश्यकताच पडली नाही.
मुंबई येथील पत्रकार परिषदेतून लाईव्ह https://t.co/ggx1cVEW8e
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 19, 2022
माझे दोन मुले. त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुले असं सहा जण आम्ही या घरात राहतो. ही निवासी इमारत शंभर टक्के कायदेशीर असतानाही सेनेकडून, मातोश्रीकडून काही लोकांना सांगून या इमारतीविरोधात तक्रार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनीही मातोश्री पार्ट टू तयार केली. आम्ही काय म्हणालो? मातोश्री पार्ट टूसाठी पैसे भरून इलिगल काम लिगल करून घेतले. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लान माझ्याकडे आहेत. पण मी कुणाच्या घरावर किंवा नोकरीवर जात नाही म्हणून गप्प आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे झाले ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. आणि तिने आत्महत्या केली असे सांगण्यात आले. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचे होते. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही? त्या इमारतीत राहायची त्यातील 8 जूनची पाने कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल त्यांनी केला.