राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत. भाजपच्या खासदारपदावरून थेट नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊन पक्षाबाहेर पडणारे नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा क्षेत्रात पहिल्याच दिवशी मोदी यांची सभा होणार आहे. साकोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती व राज्यमंत्री परिणय फुके पटोले यांच्यासमोर उभे आहेत.

राज्यात पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकार आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा राज्याच्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागांत होतील अशा रीतीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच आसपासच्या चार-पाच मतदारसंघात उपयोग होईल अशा रीतीने मोदी यांच्या सभेसाठी मतदारसंघ निवडण्यात आला आहे. १३ ऑक्टोबरला जळगाव व साकोलीमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर १६ ऑक्टोबरला अकोला, परतूर, पनवेल या ठिकाणी सभा होईल.

१७ ऑक्टोबरला पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघात मोदी सभा घेतील. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तर त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी साताऱ्यात जातील. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमुळे तसेच कोथरूडमधील उमेदवारी चर्चेत असल्यामुळे पुण्यात मोदी यांची सभा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा मुंबईत १८ ऑक्टोबरला होईल. ही शिवसेना व भाजपची संयुक्त सभा असेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यात सहभागी होतील.