हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात इंडिया आणि भारत या नावांवरून वाद निर्माण झाला आहे. भाजप सरकार इतिहासाचा विपर्यास करून भारताचे विभाजन करण्याच्या विचारात असल्याची टीका विरोधी पक्ष नेत्यांकडून होत आहे. आता या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृतीने आगीत तेल ओतायचे काम केले आहे. आज आणि उद्या दिल्लीत G20 शिखर परिषद पार पडत आहेत. या परिषदेच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींकडून विविध देशातून आलेल्या अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. परंतु या स्वागतावेळी मोदींच्या नेमप्लेटवर इंडियाऐवजी भारत असे नाव दिसले.
पंतप्रधान मोदींच्या समोर ठेवण्यात आलेल्या नेमप्लेटवर भारत असे नाव लावण्यात आल्यामुळे सरकार देशाचे नाव बदलण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता हा मुद्दा आणखीन पेटेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज G20 शिखर परिषदेची पहिली बैठक पार पडत आहे. या बैठकीच्या सुरुवातीला सर्वात प्रथम वेगवेगळ्या राष्ट्रातून आलेल्या अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रत्येक राष्ट्राच्या अध्यक्षा पुढे ठेवण्यात आलेल्या नेमप्लेटवर त्या राष्ट्राचे नाव टाकण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या नेमप्लेटवर भारत असे नाव दिसले.
त्यामुळेच आता भारत आणि इंडिया या नावावरून केंद्र सरकार काय भूमिका घेईल याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, भारत आणि इंडिया नावावरून देशात वाद वाढत चालला आहे. विरोधी पक्ष नेत्यांकडून सतत केंद्रावर टीका केली जात आहे. देशाचे नाव बदलण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचा असा आरोप विरोधकांनी लावला आहे. परंतु खुद्द पंतप्रधान मोदी यांच्याकडून देखील याविषयी कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. परंतु आता त्यांनी केलेल्या अप्रत्यक्ष कृतीतून भारत नावावर केंद्र सरकार शिक्कामोर्तब करण्याचा विचार करत असल्याचे दिसून येत आहे.