नवाब मलिकजी, माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका; समीर वानखेडेंचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ncb अधिकारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो आणि जात प्रमाणपत्र ट्विट करत समीर वानखेडे यांनी गैरप्रकार करून नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. यानंतर समीर वानखेडे यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. नवाब मलिक यांनी माझा व माझ्या कुटुंबियांचा सामाजिक माध्यमांवर अपमान केला आहे. यामुळे मी व माझे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावात आहेत, असं वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलं आहे.

माझ्या कुटुंबाची आणि माझ्याबद्दलची वैयक्तिक माहिती नवाब मलिक ट्विटरवर करत नाहक मानहानी करत आहेत. हे माझ्या कौटुंबिक गोपनीयतेचा भंग करणारे आहे. नवाब मलिक यांचं मागच्या काही दिवसातील कृत्य माझ्या कुटुंबाला मानसिक आणि भावनिक त्रास देणार ठरतंय. कुठल्याही कारणाशिवाय नवाब मलिक हे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, त्याने मला दुःख होतंय” अशा भावना वानखेडेंनी व्यक्त केल्या आहेत.

माझे नाव समीर दाऊद वानखेडे, असे असल्याचे मलिक यांनी ट्विटरवर म्हटले आहे. वास्तवात माझ्या वडिलांचे खरे नाव ज्ञानदेव कचरुजी वानखेडे असून ते उत्पादन शुल्क विभागातील निवृत्त वरिष्ठ निरीक्षक आहेत. माझ्या आईचे नाव झहिदा (आता हयात नाही) होते. मी बहु धार्मिक व धर्मनिरपेक्ष भारतीय पारंपरिक कुटुंबातील असून त्याचा अभिमान आहे. मी २००६ मध्ये डॉ. शबाना कुरैशी यांच्याशी विवाह केला व कायद्यानुसार २०१६ मध्ये घटस्फोटदेखील झाला. त्यानंतर २०१७ मध्ये मी क्रांती दिनानाथ रेडकर यांच्याशी विवाह केला. परंतु मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सामाजिक माध्यमावर खोटी माहिती पसरवून माझी प्रतिम मलिन करीत आहेत असेही वानखेडे यांनी म्हंटल.

You might also like