मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल ; खडसेंचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल”, असा इशारा एकनाथ खडसेंनी भाजपला दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवादच्या निमित्ताने ते बोलत होते.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, आज कार्यकर्ते भाजपा सोडतायेत, त्यांच्या मनात असुरक्षितता आहे, इतकं करूनही नाथाभाऊला न्याय मिळाला नाही, त्यांच्यामागे ईडी लावली जातेय, काय काय धंदे केले जातात, नाथाभाऊंना कसं तुरुंगात टाकता येईल असं बघितलं जातं आहे, पण मी कधीही आयुष्यात धंदे केले नाहीत, आयुष्यात कधीही २ नंबरच्या धंद्यात पडलो नाही, अख्ख्या जळगाव जिल्ह्यात कोणीही सांगावं कोणाकडून नोकरीसाठी पैसे घेतलेत, कामासाठी पैसे घेतलेत, एकाने उभं राहावं आणि सांगावं नाथाभाऊ खोटं बोलतायेत असं आव्हान त्यांनी दिले.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटलांसह अनेकांनी मला सांगितलं तुमच्या मागे ईडी लागू शकते, त्यावर मी प्रवेश मेळाव्यात म्हटलं होतं, माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. परंतु आता माझ्यामागे प्रत्यक्षात ईडीची चौकशी लावली आहे, त्यामुळे मी सीडी लावण्याचं काम करणार आहे असं म्हणत खडसेंनी भाजपाला गंभीर इशारा दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like