हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज त्यांच्यावर हल्ला करण्याच्या रचलेल्या कटात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील असल्याचा आरोप केला. पडळकरांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. “पडळकरांकडून जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या बदनामीचा प्रयत्न केला जात असून यामागे त्याचा पब्लिसीटी स्टंट आहे,” असे मिटकरी यांनी म्हंटले आहे.
गोपीचंद पडळकरांकडून गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर त्यांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिली आहे. माध्यमांशी बोलताना मिटकरी म्हणाले की, आरोप कोणीही करते. मात्र, तो सिद्ध करता आला पाहिजे. पडळकरांची मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबियांची नावे घेऊन मोठं होण्याची धडपड सुरु आहे.
गोपीचंद पडळकरांकडून केवळ पवार कुटुंबियांवर टीका करून पब्लिसीटी स्टंट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही जर खरच जनतेचे नायक असाल आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही जनतेत खुलेआम फिरावे. कशाला तुम्हाला सुरक्षा रक्षक हवे आहेत, असे आव्हान यावेळी मिटकरी यांनी पडळकरांना दिले.