हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीआरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपवर निशाणा साधला. “आज जर लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर केंद्रावर दबाव आणून ओबीसींना आरक्षण मिळवून दिले असते. मात्र, ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून भाजप कायदेशीर फंडे वापरत आहे, अशी टीका भुजबळ यांनी भाजपवर केली.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री छगन भुजबळ आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करत आहोत. ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून भाजप कायदेशीर फंडे वापरत आहे. भाजपकडून केल्या जात असलेल्या छुप्या प्रकाराला जनतेने हे लक्षात घ्यायला हवे.
आजच्या घडीला तमाम अशा ओबीसी प्रवर्गातील लोकांच्यासाठी त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात कोण आहे ते जनतेने समजून घ्यावे. आणि जनतेनेच भाजपला धडा शिकवावा. इम्पिरिकल डेटा द्यावा अशी आमची मागणी आहे. भले तो सदोष का असेना पण केंद्राने हा डेटा दिला पाहिजे. आम्ही त्या चुका दुरुस्त करू. पण डेटा द्या. इम्पिरिकल डेटा देणं ही केंद्राची जबाबदारी होती. उज्ज्वला योजना देताना या डेटाचा केंद्र सरकारने वापर केला होता. मग आम्हालाच हा डेटा का दिला नाही? असा सवाल यावेळी भुजबळ यांनी केला.