मुंबई । महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या चर्चेवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज एक विधान केलं आहे. आम्ही सर्वजण बैठकींना एकत्र असतो, प्रेमानं वागतो त्यामुळे काँग्रेस नेते सरकारमध्ये नाराज असल्याचं मला तरी दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आव्हाड म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी बैठकांना एकत्रित बसत आहोत, प्रेमानं वागत आहोत. तसंच आम्ही सध्या चेतना मानसिकतेतून पुढे जात असल्याने मला तरी यात काही दिसत नाही.” तसेच भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सरकारच्या कारभारावरील टीकेवर आव्हाड म्हणाले, ‘आज करोना विषाणूचे जागतिक संकट निर्माण झाले आहे. मात्र, राज्यातील विरोधीपक्ष नको त्या गोष्टीत राजकारण करू पाहत आहे, असं करून चालणार नाही.”
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याच्या कारणावरून नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांनी एक बैठक काही दिवसापूर्वी पार पडली. या बैठकीनंतर हा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अन्य नेत्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर झाल्याचे सांगितले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”