कांदा-कापसाच्या प्रश्नाचे विधानभवनात पडसाद; गळ्यात माळा घालून विरोधकांचे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकारकडून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. नाशिकसह महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटला असल्याने याचे पडसाद आज विधानभवनात उमटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन घोषणाबाजी केली तसेच राज्य सरकारने तात्काळ कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी आमदारांनी केली.

राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कांद्याला हमी भाव मिळावा म्हणून काळ नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यानी आंदोलन करत बाजारसमितीचे कांद्याचे लिलाव बंद पाडले. दरम्यान आता कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह आमदार कांदा प्रश्नी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कांदा व कापसाचा मुद्दा उचलत आज विधानभवनात राज्य सरकारला जाब विचारणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर गळ्यात कांद्याच्या माळा आणि कापसाची टोपी घालून आंदोलन केले. यावेळी सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी परिसर दणाणून सोडला.

मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कांदा व कापसाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर या सरकारला कांद्यासारखं सोलून काढू, असा इशारा दिला आहे.

कांदा प्रश्न पेटला

नाशिक जिल्ह्यात 51 हजार हेक्टर जमिनीवर लाल कांद्याची लागवड झाली आहे. त्यातील अजूनही निम्मा म्हणजे साधारणपणे 20 ते 25 हेक्टर क्षेत्रावरील कांदा अजूनही बाजारात येणे बाकी आहे. कांद्याच्या माध्यमातून लासलगावसह जिल्ह्यातील इतर बाजारात समितीत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र सध्या गुजरात, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात कांद्याला मागणीच नाही. सध्या बाजारात येणारा लाल कांदा लवकर खराब होत असल्याने त्याची साठवण क्षमता कमी आहे.