हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप सुरू असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपची आरक्षणविरोधात वेगळी विचारधारा आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधातही भाजप काही लोकांना कोर्टात पाठवत आहे,’ असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
आजच्या घडीला मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवत आहेत आणि याप्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण करत आहेत. कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्यावर ओबीसींच्या आरक्षणाला सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते आणि त्यावेळी निर्णय घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे होते,’ याची आठवणही नवाब मलिक यांनी करून दिली आहे. ‘ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारनं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं नाकारली आहे. मात्र, ओबीसींना इतर आरक्षणासोबत राजकीय आरक्षण राहिले पाहिजे या मताशी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सहमत आहे,’ असंही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.