Wednesday, June 7, 2023

गुजरात निवडणुक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला धोबीपछाड देत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. भाजप तब्बल १५८ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आणि आपचा सुफडा साफ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत गुजरातचा निकाल एकतर्फी होईल, याबद्दल कुणाच्या मनात शंका नव्हती. अनेक प्रकल्प तिकडे पळवले त्यामुळे या निकालाबाबत शंका नव्हती असं म्हंटल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले, गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्यात आली. त्याचा हा परिणाम होणार हे सर्वांना माहिती होतं, तसा निकाल आता पाहायला मिळत आहे.

परंतु गुजरातचा निकाल लागला याचा अर्थ देशामध्ये एका बाजूला मतप्रवाह जातोय, हे खरं नाही. त्याचं उत्तर उदाहरण दिल्ली महापालिकेत तिथल्या जनतेनं दाखवलं. जवळपास 15 वर्ष दिल्ली महापालिकेची सूत्रं भाजपकडे होती, ती आता राहिलेली नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील”, असं म्हणत शरद पवार म्हणाले. हिमाचल मध्ये भाजपचं राज्य होतं त्या ठिकाणी आता काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. दिल्लीमध्ये भाजपचं राज्य गेलं आहे. पंजाबमध्ये देखील गेलं आहे आणि आता हिमाचलमध्ये सुद्धा राज्य गेलं आहे. याचा अर्थ हळूहळू आता बदल व्हायला लागला आहे असेही शरद पवार म्हणाले.