“नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो”; राष्ट्रवादीच्या आंदोलनातून रुपाली चाकणकरांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून वारंवार गॅस, पेट्रोलच्या दरात वाढ केली जात आहे. दरम्यान आज मोदी सरकारच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने पुण्यातल्या स्वारगेट चौकात जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी “प्रधानसेवक नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो, निर्मला आक्का तुम्ही या जागराला या हो..”असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोंधळ, जागर करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या आंदोलनातून मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी टीका करताना चाकणकर म्हणाल्या की, केंद्र सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. महागाईच्या विरोधात महिलांचा रोष आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. केंद्र सरकारमुळे महिलांचे अर्थिक नियोजन कोलमडून गेले आहे. त्यामुळे आता तरी या मोदी सरकारला सुबुद्धी यावी.

चाकणकरांनी आपल्या आंदोलनातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करीत म्हंटले आहे की, महागाईने ग्रस्त जनतेच्या यातनांकडे दुर्लक्ष करून मोदी सरकार झोपेचे सोंग घेत आहे. अशा या झोपेचं सोंग घेणाऱ्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वारगेट चौक येथे आयोजित जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येत आहे.