हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांना साखर कारखान्या संबंधित, तसेच त्याचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून भाजप नेते निलेश राणे यांनी पवार कुटुंबियांवर हल्लाबोल केला आहे. हजारो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले त्याची भरपाई पवार कुटुंबाला ह्याच जन्मात करावी लागेल, अशी टीका त्यांनी केली.
शरद पवारांनी उलटा नियम लावून शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने उद्योगपतींच्या नावाने केले. शेतकऱ्यांचे कारखाने उद्योगपती आणि पवार कुटुंबियांना द्यायचे आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे. त्यांच्या उपजिविकेचे साधन काढून घ्यायचे, “असे म्हणत असल्याचा तक्रारदार माणिकराव जाधव यांचा एक व्हिडीओ निलेश राणे यांनी आपल्या ट्विटवरुन पोस्ट केला आहे.
“पवार कुटुंबाने हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावले हे पुरावे सहित यंत्रणांकडे पोहोचलेलं आहे. हजारो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले त्याची भरपाई पवार कुटुंबाला ह्याच जन्मात करावी लागेल, ही तर सुरुवात आहे. साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.