काँग्रेसची दारं नाथाभाऊंसाठी नेहमी खुली- बाळासाहेब थोरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यान पक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला होता. तसेच कोरोनाचं संकट संपल्यानंतर निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण देत आपण अशी कुठलीही ऑफर खडसे यांना दिली नसल्याचे म्हटलं आहे. मात्र, खडसेंसाठी आमची दारं कायम खुली असून आम्ही त्यांचं स्वागतच करु असं बाळसाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

”आम्ही कोणतीही ऑफर एकनाथ खडसेंना दिली नाही. भाऊ आम्ही सोबत आहोत असं बोलल्याचा अर्थ तुम्ही कसाही लावू शकता. भाजपा पक्षात होणारी एकनाथ खडसेंची अवहेलना पहावत नाही. काँग्रेसची दारं एकनाथ खडसेंसाठी नेहमी खुली आहेत,” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ”भाजपाला जनमानसाचा आधार असलेला, स्वावलंबी नेता नको असतो असं मला वाटतं. भाजपात बहुजन समाजाच्या नेत्याचा प्रभाव वाढू नये याची काळजी नेहमी घेतली जाते. भाजपाचा अभ्यास केला तर तसा तर्क काढला जाऊ शकतो. पक्षात राहूनही एकनाथ खडसेंना अंतरंग उशिरा कळले,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

एकनाथ खडसे माझे फार जुने मित्र आहेत. १९९० ला विधानसभेत आले तेव्हापासून आम्ही एकत्र काम करत आहोत. पक्ष वेगळे असले तरी आमच्यात मैत्री आहे. एक समर्थ विरोधी पक्षनेता आम्ही त्यांच्यात पाहिला. असा नेता जर काँग्रेसच्या विचारासोबत येत असेल तर आम्ही स्वागतच करु. ऑफर दिली की नाही हे महत्त्वाचं नसून आम्ही त्यांचे स्वागतच करु, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. दरम्यान, इतर नाराज नेत्यांना संपर्क करण्याचा काँग्रेसने कोणताही प्रयत्न केलेला नाही आणि करणार नाही. पण त्यांनी भाजपाची पुढील रणनीती देशाच्या आणि आपल्या हिताची आहे का ओळखणं गरजेचं आहे,” असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment