Friday, December 26, 2025
Home Blog Page 2736

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडणार? रशिया- युक्रेन युद्धामुळे कच्या तेलाचे दर वाढले

Petrol Diesel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या लष्करी कारवाईच्या घोषणेनंतर एकीकडे जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत, तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीही भडकल्या आहेत. गुरुवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रथमच प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेली आहे. 8 वर्षात प्रथमच ब्रेंट क्रूडची किंमत ही विक्रमी पातळी गाठली आहे.

रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, जो प्रामुख्याने युरोपियन रिफायनरींना कच्चे तेल विकतो. युरोपातील देश रशियाकडून 20 टक्क्यांहून अधिक तेल घेतात. याव्यतिरिक्त, जागतिक उत्पादनात रशिया जगातील 10 टक्के तांबे आणि 10 टक्के अॅल्युमिनियम उत्पादन करतो.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की जर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तर कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल $100 ते $120 पर्यंत पोहोचू शकतात. नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यामुळे वाईट परिणाम होईल. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये व्यत्यय आल्याने देशांना वीज उत्पादनात मोठी कपात करावी लागू शकते. रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडू लागतील आणि महागाई शिगेला पोहोचू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम भारतातही दिसून येईल. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे तेलाच्या किमती वाढत आहेत आणि युद्ध झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढतील आणि १०० डॉलरच्याही पुढे जातील हे निश्चित आहे.

‘93 च्या दंगलीवेळी बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, आज त्यांचाच मुलगा…; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करत अटक करण्यात आली. दरम्यान मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपकडून केली जात असताना राजीनामा न घेण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “93 च्या दंगलीवेळी बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, आज त्यांचाच मुलगा दंगलीतील आरोपींना वाचवतोय,” अशी टीका राणेंनी केली आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी नुकतेच ट्विट केले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “93 च्या दंगली नंतर मुंबई मा.बाळासाहेबांनी वाचवली. आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना ९३ च्या दंगलीतील आरोपींना वाचवतो आहे. म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची!!!,” असे ट्विट राणे यांनी केले आहे.

राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आणि नंतर त्यांना झालेली अटक यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या कारवाईवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. त्यातच आज भाजप नेत्यांकडून मलिक यांना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले जात आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनीही नवाब मलिक याच्या अटकेप्रकरणी धरण आंदोलन सुरु केले आहे.

Gold Price : रशिया-युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी उसळी, आजची किंमत तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे. बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात जोरदार उसळी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 1.42 टक्क्यांनी वाढला आहे. त्यानंतर सोन्याने 51,000 पार केले आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा भाव आज 1.40 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे.

सोन्या-चांदीचा भाव
एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 1.42 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 51,095 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 1.40 टक्क्यांच्या वाढीसह 65,490 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,200 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,110 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,200 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,900 रुपये
पुणे – 46,850 रुपये
नागपूर – 46,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,110 रुपये
पुणे -51,200 रुपये
नागपूर – 51,200 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4595.00 Rs 4615.00 0.433 %⌃
8 GRAM Rs 36760 Rs 36920 0.433 %⌃
10 GRAM Rs 45950 Rs 46150 0.433 %⌃
100 GRAM Rs 459500 Rs 461500 0.433 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5013.00 Rs 5035.00 0.437 %⌃
8 GRAM Rs 40104 Rs 40280 0.437 %⌃
10 GRAM Rs 50130 Rs 50350 0.437 %⌃
100 GRAM Rs 501300 Rs 503500 0.437 %⌃

 

बहुप्रतिक्षित मनमाड-नांदेड विद्युतीकरणाला लवकरच होणार सुरुवात

danve

औरंगाबाद – मराठवाड्यातील बहुप्रतीक्षीत अशा जालना-मनमाड आणि जालना-नांदेड या दोन लोह मार्गांच्या विद्युतीकरणाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तसेच पुढील आठवड्यात या दोन्ही कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून गेल्या काही दिवसांपासून यासाठी मंत्री दानवे यांचा पाठपुरावा सुरु आहे. अखेर या योजनेला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती त्यांनी नुकतीच दिली. केंद्र सरकारच्या वंदे भारत या रेल्वे योजनेअंतर्गत रेल्वे मराठवाड्यातूनही धावली पाहिजे, अशी मंत्री दानवे यांची महत्त्वाकांक्षा आहे. या मार्गांचे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदे भारत रेल्वे मराठवाड्यातील दोन स्थानकांदरम्यान धावू शकेल. यामुळे येथील प्रवाशांची सोय होईल आणि औद्योगिक विकासास चालना मिळेल.

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्रीपदी विराजमान झाल्यावर रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील रेल्वे मार्गांचे जाळे अधिक सशक्त करण्यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणली जाणारी ‘वंदे भारत’ रेल्वे आपल्या भागातूनही जावी, अशी मराठवाड्यातील जनतेची इच्छा आहे. मात्र ज्या लोहमार्गाचे विद्युतीकरण झालेले आहे, अशाच मार्गावर वंदे भारत रेल्वे धावत नाही, हे कळताच मंत्री दानवे यांनी ही रेल्वे आपल्या भागातही यावी, यासाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर आता जालना- मनमाड आणि जालना-नांदेड या दोन लोहमार्गांच्या विद्युतीकरणाच्या कामासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

‘वंदे भारत’ ही सेमी हायस्पीड रेल्वे आहे. अशा प्रकारची रेल्वे प्रामुख्याने दोन शहरांमध्ये दिली जाते. तसेच ताशी 130 ते 180 किमी एवढा तिचा वेग असतो. सध्या देशातील काही प्रमुख शहरांमध्येच ही रेल्वे उपलब्ध आहे. जालना ते मनमाड आणि जालना ते नांदेड या मार्गाचे विद्युतीकरण झाल्यावर येथील रेल्वेचा वेग ताशी 120 ते 130 किमी असेल. तसेच या मार्गावर नव्या रेल्वे सुरु करता येतील. यात प्रामुख्याने इंटरसिटी ट्रेनचा समावेश असेल.

Share Market : सेन्सेक्स 1,814 अंकांच्या घसरणीने तर निफ्टीने 500 हून जास्त अंकांनी घसरला

Share Market

नवी दिल्ली । गुरुवारी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीने वर्षातील मोठ्या घसरणीसह ट्रेडिंगला सुरुवात केली. रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे जागतिक बाजारपेठही दबावाखाली आहे.

मार्केट ओपनिंगमध्येच सेन्सेक्स 1,814 पॉइंट तोडून 56 हजारांवरून खाली जाऊन 55,418.45 वर उघडला. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 514 अंकांच्या घसरणीसह ट्रेडिंगला सुरुवात केली आणि 17 हजारांच्या खाली 16,548.90 वर उघडला. दोन्ही एक्सचेंजेसवर गुंतवणूकदारांची बंपर विक्री होताना दिसली. सकाळी 9.25 पर्यंत थोडी सुधारणा झाली होती आणि सेन्सेक्स 1,448 अंकांच्या घसरणीसह 55,743 वर ट्रेड करत होता. त्याचप्रमाणे निफ्टी 419 अंकांनी घसरून 16,444 वर ट्रेड करत होता.

सर्व सेक्टर्स रेड मार्कवर
बीएसई आणि एनएसईवरील सर्व क्षेत्रांमध्ये घसरण आहे. ऑटो, बँक, एफएमसीजी, ऑइल अँड गॅस, आयटी, एनर्जी आणि रियल्टी शेअर्स 2 ते 4 टक्क्यांनी घसरत आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 3 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. निफ्टी बँकेच्या शेअर्स मध्येही 4 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

आशियाई बाजारही तोट्याने उघडले
24 फेब्रुवारीला उघडलेल्या बहुतांश आशियाई बाजारांनी घसरणीसह ट्रेड सुरू केला. सिंगापूरचे शेअर बाजार 1.65 टक्के आणि जपानचे 1.12 टक्क्यांनी घसरले. याशिवाय तैवानच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये 1.18 टक्के आणि दक्षिण कोरियामध्ये 1.72 टक्के घसरण झाली. आशियाई बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय गुंतवणूकदारांवरही नक्कीच दिसून येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

“महाविकास आघाडीतील जास्तीत जास्त मंत्री अटक व्हावे हे भाजपचे स्वप्न”; जयंत पाटील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अटकेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजप व केंद्र सरकारवर निशाणा साधला. “ज्या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जातात त्यांना विरोध करणार्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील जास्तीत जास्त मंत्री अटक व्हावेत असे भाजपचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने त्याचे प्रयत्न चालले आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

आज मुंबईत मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते नवाब मलिकांच्यावर केलेले आरोप चुकीच आहेत. ज्याने जागा खरेदी केली म्हणून त्यांना आतमध्ये टाकणे हे अत्यंत चुकीचं आहे. मलिक यांच्यावर करण्यात आलेले आरोप आहेत त्यांना नवाब मलिक यावर सविस्तर उत्तर देतील. मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळ ते आमच्या मंत्रीमंडळात कायम राहतील.

भाजपचे लोक दररोज काहींना काही तरी करून मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कोणत्याना कोणत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून त्यांच्याकडून असे प्रयत्न केले जात आहेत कशा प्रकारे महा विकास आघाडी सरकारमधील मंत्री कशा पद्धतीने तुरुंगात जातील, याचे स्वप्न भाजप नेते पाहत आहेत. मात्र, त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे; मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Mohit Kamboj Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित जमीन व्यवहार प्रकरणी ईडी कडून अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे. त्यांनी अनेक बांगलादेशी मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलले होते, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला. नवाब मलिक यांनी बांगलादेशी मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलले होते, पूर्वीच्या काळी कुर्ल्यातील लोक त्यांना प्रचंड घाबरायचे. मलिक यांचा वेश्या व्यवसाय, ड्रग्ज पेडलिंग आणि देशविरोधी कारवायांशी संबंध आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना तात्काळ राजीनामा द्यायला सांगावा, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली.

नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीत त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध उघड होतील, असा दावा मोहित कंबोज यांनी केला. मलिक यांच्यानंतर त्यांच्या जावयाचीही पुन्हा चौकशी करावी. आपल्याला देशाविरोधी कारवाई करणारे नेते हवेत आहेत का ?? कोणताही पक्ष, नेता देशापेक्षा मोठा कसा असू शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विशेष निमंत्रण : छ. उदयनराजेंची आज मोठी घोषणा, ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात आज छ. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून राजवाड्यावर दरवर्षीप्रमाणे मोठी गर्दी झाली आहे. आज गुरूवारी दि. 24 वाढदिवसानिमित्त छ. उदयनराजे भोसले एक मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी त्यांनी पत्रकारांना व जनतेस निमंत्रण दिले आहे. या संदर्भात उदयनराजे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या ट्विटमुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उदयनराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, उद्या एक मोठी घोषणा करायचे मनात आहे. राजकीय आरोप-प्रत्याआरोपांच्या ह्या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील. त्यामधले काहीच आसणार नाही. उपक्रम अभिनव असे आहे. तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे नाही.

https://twitter.com/Chh_Udayanraje/status/1496443700917977090?s=20&t=WDg0LgcN-4q0331s0pM6cw

आपण सारेच आपल्या भोवती सुरू असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र…आपण सारेच आपल्या भोवती सुरू असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वतःच एक व्यवस्था उभी करण्याचे ठरविले आहे.

कोणता प्रश्न काय व्यवस्था अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणांस सदर पत्राने आमंत्रण देत आहोत. 24 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता गांधी मैदान, राजधानी सातारा याठिकाणी आपण उपस्थित रहावे असे आमंत्रण देण्यात आले आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेची गती मंदावली

water supply

औरंगाबाद – शहराची लोकसंख्या 2050 पर्यंत किती राहील हे गृहीत धरून 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मागील वर्षभरापासून काम सुरू असले तरी कामाला अजिबात गती नाही. मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. याची गंभीर दखल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली जाणार आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम प्राधान्याने करणे गरजेचे असताना कंपनी शहरात जलवाहिनी टाकण्याच्या कामात अधिक मग्न आहे. मुख्य जलवाहिनी टाकण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परवानगी दिली. भूसंपादन करून देण्याची तयारी देखील या यंत्रणेने दाखवली. परंतु जीव्हीपीआर कंपनीकडून पाईप निर्मितीचे काम रेंगाळले आहे. पाईप तयार होऊन त्याची तपासणी बंधनकारक आहे.

जोपर्यंत सर्व निकषांवर तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत पाईपचा वापर करता येणार नाही. त्याचप्रमाणे शहरात विविध भागात जलकुंभ उभारण्याची कामेही बंद आहेत. कंपनीने मुख्य जलवाहिनी कडे लक्ष द्यावे अशी सूचना वारंवार करूनही काम सुरू नाही. याबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होईल. या बैठकीनंतर कामाला वेग येईल अशी अपेक्षा मनपा प्रशासन अस्तिककुमार पांडे यांनी व्यक्त केली.

मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मंत्रालयाजवळ आंदोलन सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर आघाडीतील नेत्यांकडून मंत्रालयाच्या आवारात धरणे आंदोलन सुरु केले आहे. मलिक यांना पाठींबा देण्यासाठी आणि ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात आघाडीला बढे नेते सहभागी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करत अटक करण्यात आली. मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज मुंबईतील मंत्रालय परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच अभिवादन करून धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आले.

या आंदोलनास उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, रुपाली चाकणकर, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री हसन मुश्रीफ, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व नेते उपस्थित आहेत.