Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2774

साताऱ्यात मनसे आग्रही : पावनखिंड चित्रपटासाठी थिएटर 100% क्षमतेने खुली करण्याची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची सुवर्ण पाने उलघडणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांची बात काही औरच असते. कारण हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाची आन, बान आणि शान आहे. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांमधून जेव्हा हा इतिहास आपल्या समोर येतो. तेव्हा गर्वाने प्रत्येकाचा उर भरून येतो, म्हणूनच दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ या मराठी ऐतिहासिक चित्रपटातुन वीर बाजीप्रभूंची झुंज आणि निष्ठा दर्शविली आहे. हा चित्रपट येत्या 18 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे चित्रपटगृहे खुली करण्यात आली आहेत. मात्र केवळ 50% क्षमतेने म्हणून आता मनसेने अगदी मेट्रो सिटींपासून सर्वत्र राज्यात थिएटर 100% खुली करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेने चित्रपट गृहे 100% क्षमतेने खुली करण्याबाबत साताऱ्यात आग्रही भूमिका घेतल्याचे आज दिसून आले. दरम्यान सातारा जिल्हाध्यक्ष रोहित मोरे यांनी शुक्रवारी प्रदर्शित होणार्‍या “पावनखिंड” या चित्रपटासाठी 100% आसन क्षमतेने चित्रपटगृहे चालू करण्याबाबत प्रांत अधिकारी व चित्रपटगृहातील वरिष्ठ अधिकारी वर्गांना निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय गरगटे, कराड तालुका अध्यक्ष सचिन घाडगे, कराड शहर अध्यक्ष अक्षय कुंभार तसेच जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

याआधी मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सरकारकडे चित्रपटगृहे 100 खुली करण्याबाबत आग्रही मागणी केली होती. त्यांनी लिहिले होते कि, राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी आहे…रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये तुडुंब पार्ट्या सुरु आहेत… मॉल्समध्ये खरेदीसाठी झुंबड उडालेली असते… पण तरीही नाट्यगृहं-चित्रपटगृहं अजूनही पन्नास टक्के क्षमतेनेच चालवायची असा महाआघाडी सरकारचा अजब न्याय आहे. हा अन्याय आतातरी सरकारने दूर करावा. ‘पावनखिंड’ सारख्या भव्य ऐतिहासिक चित्रपटापासून 100 टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृहं सुरु करावीत, ही मनसे चित्रपटसेनेची आग्रही मागणी आहे.

Paytm, Zomato ची अवस्था पाहून ‘या’ कंपन्यांनी आपले IPO पुढे ढकलले

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजारातील IPO च्या तेजीच्या काळात काही कंपन्यानी धडा घेत आपले प्लॅन पुढे ढकलले आहेत. मोठ्या गज्यावाज्यात लिस्टिंग झालेल्या पेटीएम आणि झोमॅटोची हालत पाहून Oyo Hotels आणि Delhivery ने आपल्या IPO ची तारीख पुढे ढकलली आहे.

वास्तविक, पेटीएम आणि झोमॅटो आपल्या ऑफर प्राइस पेक्षा खूप जास्त प्रीमियमवर लिस्ट झाले होते. इतकेच नव्हे तर दोन्ही शेअर्सनी अल्पावधीतच दीडपट रिटर्नही गाठला, मात्र नुकत्याच झालेल्या बाजारातील घसरणीमुळे या दोन्ही शेअर्सची स्थिती दयनीय झाली. मार्केटमध्ये झालेली अशी उलाढाल पाहून, ऑनलाइन हॉटेल बुकिंग स्टार्टअप Oyo आणि लॉजिस्टिक स्टार्टअप Delhivery ने आपला IPO काही काळासाठी पुढे ढकलला आहे.

आता Delhivery चा IPO एप्रिलमध्ये येईल
या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की,” लॉजिस्टिक स्टार्टअप Delhivery’s Honor अजूनही मार्चमध्ये 1 अब्ज डॉलर्स (7.5 हजार कोटी रुपये) चा IPO लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनी आता आपल्या लिस्टिंग प्लॅनिंगचे पुनरावलोकन करत आहे आणि एक महिन्याच्या उशिराने म्हणजेच एप्रिलपासून ते बाजारात आणू शकते. Delhivery मध्ये सॉफ्टबँक आणि कार्लाइल ग्रुपचीही हिस्सेदारी आहे

Oyo समोर अनेक संकटे, मूल्यांकनाबाबतही प्रश्नचिन्ह
Oyo ने मागील वर्षी SEBI कडे $1.3 अब्ज IPO साठी कागदपत्रे सादर केली होती. मात्र, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि त्याचे मूल्यांकन आणि मालकीबाबत प्रश्न उपस्थित झाले. Sequoia Capital आणि Soft Bank सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी सजलेली ही कंपनी 5 महिन्यांहून जास्त काळ ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहे.

2022 मध्ये IPO ची खराब कामगिरी
ब्लूमबर्गने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये भारतीय IPO ची कामगिरी खराब झाली आहे. 2019 मध्ये, IPO ने सुमारे 42 टक्के रिटर्न दिला, त्यानंतर 2020 मध्ये रिटर्न 30 टक्क्यांच्या आसपास पोहोचला. 2021 मध्ये 50 टक्क्यांहून जास्त रिटर्न आला होता, मात्र या वर्षी आतापर्यंत 7.70 टक्क्यांनी घट झाली आहे. पेटीएमचे शेअर्स त्याच्या IPO किमतीपेक्षा 60 टक्क्यांनी कमीने ट्रेड करत आहेत.

“किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरेंवर केलेले आरोप खोटे”; कोर्लईच्या सरपंचाची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या नावे 19 बंगले आहेत, असा आरोप केला. त्यानंतर 19 बंगले कुठे आहेत, ते दाखवा, असे आव्हान राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले होते. या प्रकरणी कोर्लई गावच्या सरपंचानी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबतीत केलेले आरोप हे खोटे आहेत, असे सरपंचानी म्हंटले आहे.

कोर्लई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रश्मी ठाकरे याच्यावर किरीट सोमय्या यांनी 19 बंगले बांधले असल्याचा आरोप केला आहे. वास्तविक रश्मी ठाकरे यांनी 19 बंगले बांधलेलेच नाहीत. तर 18 घरे बांधली होती. तीही अन्वय नाईक यांनी रिसॉर्ट तयार करण्याच्या उद्धेशाने घरे बांधली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारल्याने ती पाडली.

त्या ठिकाणी झाडांची लागवड करून त्याची 2014 ला विक्री केली. 2013-14 मध्ये नाईक यांनी स्वतः ती घरे पाडली आहेत. 2014 ला रश्मी ठाकरे यांनी ती जमीन मनीषा वायकर यांना विकली. तर रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची कधीही माफी मागितलेली नाही, असे स्पष्टीकरण मिसाळ यांनी दिले आहे.

LIC IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO बद्दल 15 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या IPO ची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. LIC चा IPO 10 मार्च रोजी उघडू शकतो. 14 मार्चपर्यंत सब्सक्राइब करण्यासाठी वेळ असेल. मात्र, सरकारने अद्याप LIC चा IPO उघडण्याच्या तारखेची औपचारिक घोषणा केलेली नाही.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीची इश्यू प्राईस 2000-2100 रुपये असू शकते. LIC च्या इश्यूचा साईज 65,000 कोटी रुपयांचा असू शकतो. सरकारने रविवारी 13 फेब्रुवारी रोजी LIC चा ड्राफ्ट पेपर सादर केला होता. सरकारने म्हटले आहे की, गुंतवणूकदारांसोबत रोड शो केल्यानंतर मूल्यांकनावर निर्णय घेतला जाईल आणि मार्च 2022 मध्ये त्याची लिस्टिंग पूर्ण केली जाईल.

या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या मते, LIC च्या IPO मधील 3.16 कोटी शेअर्स त्याच्या 28.3 कोटी पॉलिसीधारकांसाठी राखीव असतील. यामध्ये पॉलिसीधारक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही सूट मिळणार आहे. पॉलिसीधारकांना इश्यू 10% स्वस्त मिळेल. LIC कडे सुमारे 13.5 लाख रजिस्टर्ड एजंट आहेत ज्यांच्या माध्यमातून कंपनी पॉलिसीधारकांना गुंतवणूकदार बनवण्याचा प्रयत्न करेल.

खाली LIC च्या IPO शी संबंधित काही महत्वाची माहिती दिली आहेत.

LIC चा इश्यू उघडेल: 10 मार्च

इश्यू बंद होईल: 14 मार्च

इश्यू प्राईस: प्रति शेअर 2,000 रुपये – 2,100 रुपये

इश्यू साइज: 31,62,49,885 शेअर्स

ऑफर फॉर सेल: 65,416.29 कोटी रुपयांचे 31,62,49,885 शेअर्स जारी केले जातील

डिस्काउंट: कर्मचारी आणि पॉलिसीधारकांना 10% सूट मिळेल

प्राइस बँडची घोषणा: मार्च 7

अँकर इनवेस्टर्स अलॉटमेंट: मार्च 9

शेअर लॉट: 7 शेअर्स

कर्मचारी: 1.58 कोटी शेअर्स राखीव आहेत, जे 10% सवलतीनंतर 1,890 रुपयांमध्ये उपलब्ध होतील

पॉलिसीधारक: 3.16 कोटी शेअर्स राखीव आहेत जे 10% सवलतीनंतर 1,890 रुपयांमध्ये उपलब्ध होतील

अँकर इनवेस्टर्स: 8.06 कोटी शेअर्स राखीव आहेत, ज्याचे मूल्य 16,935.18 कोटी रुपये आहे

क्वालीफाइड इंस्टीट्यूशनल बिडर्स: 5.37 कोटी शेअर्स राखीव आहेत, ज्याचे मूल्य 11,290.12 कोटी रुपये आहे

नॉन इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्स: 4.03 कोटी शेअर्स राखीव आहेत, ज्याचे मूल्य 8,467.59 कोटी रुपये आहे

रिटेल इनवेस्टर्स: 19,757.71 कोटी रुपयांच्या रिझर्व्हसह 9.41 कोटी शेअर्स

लिस्टेड प्रतिस्पर्धी कंपन्या: एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी

अजब शक्कल : रिमोट कंट्रोलने 27 लाख 57 हजारांची वीजचोरी, दोघांवर गुन्हा दाखल

कराड | वीज मीटरला रिमोटच्या सहाय्याने कंट्रोल करून वीज मीटरवर वीज वापराची नोंद होणार नाही, अशी तजवीज करून गत वर्षभरात 2 लाख 40 हजार 305 युनिटचे 27 लाख 57 हजार 400 रुपयांची वीज चोरी केली. याप्रकरणी दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने गोटे तालुका कराड येथील पी. बी. पॉलीमर्सवर ही कारवाई केली. रज्जाक बाबालाल पटेल व खालिद रज्जाक पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अतिरिक्त कार्यकारी अभियंता उज्वला मोहन लोखंडे यांनी शहर पोलिसात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, वीज ग्राहकांच्या वीज मीटरची व जोडभाराची तपासणी करणे, वीज चोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे, वीज चोरी करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी उज्वला लोखंडे यांच्यासह आशिष अर्जुन जगधने, किरण प्रकाश देवकर, प्रवीण बी. सरवदे यांच्यासस भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यानुसार 27 जानेवारी 2022 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरारी पथकाने गोटे येथील रज्जाक पटेल यांच्या औद्योगिक दराच्या वीज कनेक्शनची तपासणी केली असता. वीज वापर व त्यांना आलेल्या बिलामध्ये तफावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पी. बी. पॉलिमरचे रज्जाक पटेल यांना मीटरची जागा दाखवण्यास व वीज बिलाची प्रत मिळण्याची विनंती केली. त्यानुसार भरारी पथकाने वीज मीटर पाहिले असता ते पी. बी. पॉलीमर्ससाठी वीज वापर करत असल्याचे लक्षात आले. वीज मीटर व त्यावरील विजेचा वापर पाहिला असता भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी वीज मीटरवरील झाकण व वीज मीटर बारकाईने पाहिले असता वीज मीटरला बारीक छिद्र पाडून त्याच्या साह्याने मीटरमध्ये एका बाजूला छोटे किट बसविण्यात आले होते. त्याच्या साह्याने विजेचा वापर कंट्रोल केला जात होता. त्या किटला रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने नियंत्रणात ठेवले जात होते. याबाबतची खात्री पटल्यानंतर भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वीज मीटर सील करून जप्त केले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मीटरची चाचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली असता. किट बसवल्यामुळे मीटर हळू फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे वीज चोरी झाल्याचे लक्षात आले. गत वर्षभरापासून ही वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने 2 लाख 40 हजार 305 युनिटचे 27 लाख 57 हजार 400 रुपयांची वीज चोरीचे बिल रज्जाक पटेल यांना दिले. परंतु पटेल यांनी वीज चोरी झालेल्या बिलाची रक्कम कंपनीकडे भरली नसल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वीज चोरीसाठी वापरलेले साहित्य मीटर, किट, रिमोट आदी जप्त केले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे करत आहेत.

PLI Scheme : सरकारने ‘या’ पद्धतींचा वापर केल्यास चीनवरील आयात अवलंबित्व कमी होईल

नवी दिल्ली । सेमीकंडक्टर, फार्मा आणि कृषी उत्पादनांसह इतर वस्तूंसाठी इतर देशांवरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकार विविध प्रयत्न करत आहे. या दिशेने एक मोठे पाऊल उचलत सरकारने गेल्या वर्षी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीम सुरू केली होती. आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी परदेशी आणि भारतीय कंपन्यांना उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

SBI रिसर्चने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारताने PLIयोजनेचा लाभ घेतल्यास आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना दिल्यास चीनवरील आयात अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. PLIयोजनेंतर्गत, सरकार विविध पद्धतींचा अवलंब करून चीनमधून आयातीवरील आपले अवलंबित्व 50 टक्क्यांनी कमी करू शकते.

व्यापार तूट कमी करण्यात भारताला यश आले आहे
रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आयात अवलंबित्व कमी केल्याने देशाच्या GDP लाही गती मिळेल आणि ती 20 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते. त्यात पुढे म्हटले आहे की, 2020-21 मध्ये चीनसोबतची व्यापार तूट कमी करण्यात भारत यशस्वी झाला होता, मात्र भारताच्या एकूण वस्तूंच्या आयातीमध्ये चीनचा वाटा 16.5 टक्के दराने वाढत आहे.

PLI ‘या’ क्षेत्रांमध्ये उत्पादन वाढवेल
रिपोर्टनुसार, 2020-21 मध्ये, चीनमधून केलेल्या 65 अब्ज डॉलर्सच्या आयातीपैकी सुमारे 39.5 अब्ज डॉलर्सची आयात वस्तू आणि उत्पादनांची होती. कापड, कृषी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, फार्मा आणि रासायनिक क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी भारताने PLI योजना जाहीर केल्या आहेत. PLI योजनांमुळे आपण चीनमधून आपली आयात 20 टक्क्यांनी कमी करू शकलो, तर आपला GDP 8 अब्ज डॉलर्सने वाढू शकेल.

पहिल्या तीन तिमाहीत 68 अब्ज डॉलर्सची आयात
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत भारताने चीनकडून 68 अब्ज डॉलर्स किंमतीची उत्पादने आयात केली. वाणिज्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी कोरोना संकटात भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली होती. गेल्या वर्षी भारताची चीनला निर्यात 34 टक्क्यांनी वाढून 22.9 अब्ज डॉलर्स झाली. कोरोनापूर्वी 2019 मध्ये ही निर्यात 17.1 अब्ज डॉलर्स होती.

“संजय राऊतच उद्धव ठाकरे यांना डुबवणार”; चंद्रकांतदादांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्यासह अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. राऊतांच्या आरोपानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. “खरं तर संजय राऊतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डुबवणार आहेत, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, इतिहासात ज्या काही घटना घडल्या आहेत. त्या काही कारणाने पुन्हा बाहेर काढल्या जातात. १९९३ साचा बॉम्बस्फोटाची घटना असो, कालपासून ईडीचेही धाडसत्र सुरु झाले. याबाबत प्रतिक्रिया या उमटू लागल्या आहेत. संजय राऊत याच्या संबंधित किरीट सोमय्या यांनी काही मुद्दे उपस्थित केले तर अब्रू नुकसानीचा दावा केला जातो.

मात्र, अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन काय दाखवण्याचे काम केले. खर तर कालच्या पत्रकार परिषदेत एकपात्री प्रयोग झाला. त्यामध्ये अभिनयाचे सर्व प्रयोग केले गेले. आदरणीय शरद पवार यांच्या अजेंड्यावर राहणारे संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना डुबवणार आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांच्या टिकेनंतर खासदार संजय राऊत काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

…अन्यथा कामबंद आंदोलन : सातारा जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा इशारा

Mahavitran

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

अवर्षण अतिवृष्टी भारनियमन इत्यादी परिस्थितीमध्ये महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही वेळोवेळी काम करतो. मात्र, ठेकेदारांची बिले सहा- सहा महिने प्रलंबित राहतात. त्यामुळे आम्हाला प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासंदर्भात येत्या आठ ते दहा दिवसात निर्णय न झाल्यास आम्ही सर्व कामे बंद करू, असा इशारा सातारा जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

साळुंखे पुढे म्हणाले , “इलेक्ट्रिक कामासाठी लागणारे स्टील कॉपर ॲल्युमिनियम ट्रांसफार्मर केबल फॅब्रिकेशन इत्यादी वस्तूंच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र महावितरणच्या दर सूचीमध्ये या किमती सरकारी दराप्रमाणे खूपच कमी आहेत. महावितरण चे सध्याचे दर 2018- 19 चे आहेत. बांधकाम विभाग, सातारा औद्योगिक वसाहत, जिल्हा परिषद येथे दर वर्षी दरसूचीच्या सुधारित दरानुसार काम केले जाते. मात्र, महावितरणचा दर मात्र अजूनही जुनाच आहे. या संदर्भात महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे वारंवार जिल्हा संघटना व राज्य संघटना यांनी पाठपुरावा करूनही अद्यापही काही प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन कॉस्ट डेटा यासंदर्भात प्रस्ताव संचालकांकडे मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, तीन महिने उलटले तरी या विषयावर निर्णय झालेला नाही.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये ठेकेदारांनी महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अडीअडचणीच्या काळात कामे केली. मात्र, सहा महिने उलटले तरी महावितरणच्या प्रकाश गड येथील मुख्य कार्यालयाला बिले जाऊनही अद्याप त्याची देयके अदा झालेले नाहीत. त्यामुळे जीएसटी भरणे बँक लोण हप्ते भरणे प्रलंबित देणी देणे कामगारांचे वेतन इत्यादी काम पूर्ण करण्यामध्ये ठेकेदारांची प्रचंड अडचण होत आहे. या संदर्भात गेल्या आठ दिवसात निर्णय न झाल्यास कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन संपूर्ण सातारा जिल्हा व महाराष्ट्रातील काम बंद करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेस संघटनेचे उपाध्यक्ष अनिल बामणे सचिव प्रवीण कोल्हे खजिनदार पृथ्वीराज पवार उपस्थित होते.

“संजय राऊत अन् उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही…”; भातखळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, मोहीत कंबोज, नील सोमय्या यांच्यासह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली. “संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही. मुंबई महानगर पालिकेत सोडा, पण नगरपालिकेच्या निवडणुकीतही संजय राऊत कधी निवडून आले नाहीत,”असे भातखळकर यांनी म्हंटले आहे.

आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल जे काही भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर आरोप केले गेले. ते आरोप करणारे संजय राऊत म्हणजे काय महाराष्ट्र आहे का? मुंबई महानगर पालिकेत सोडा, पण नगरपालिकेच्या निवडणुकीतही संजय राऊत कधी निवडून आले नाहीत.

खरं तर आमच्यासोबत युती केल्याशिवाय यांना कधी शंभर जागा मिळाल्या नाहीत. राऊतांना वाटतं की त्यांचे भांडुपचे घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे. गैरसमजात राहू नका. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाहीत. राऊतांनी एक महानगर पालिकेची निवडणूक तरी लढवावी. आयुष्यभर तुम्ही राज्यसभेत गेला आहात. राऊत-उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही”, असे भातखळकर यांनी म्हंटले.

उरमोडी धरणात प्लॅस्टिक कॅन बांधून पोहणाऱ्या युवकाचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात असलेल्या उरमोडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या उरमोडी धरणात ही दुर्देवी दुर्घटना घडली. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे.

घटनेची मिळालेली माहिती अशी, उरमोडी धरणाच्या सांडव्यात चार मित्र पोहण्यासाठी गेले असता. एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अलोक संतोष शिंदे (वय- 18, रा. पाटखळ, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी दि. 15 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चाैघेजण उरमोडी धरणात पोहण्यासाठी गेले होते. यामध्ये अलोक शिंदे हाही होण्यासाठी गेला होता.

दरम्यान, अलोकला आणि त्याच्या मित्रांना पोहता येत नव्हते. तरीदेखील उरमोडी धरणाच्या सांडव्यात अंगाला प्लॅस्टिकचे कॅन बांधून पाण्यात उतरले होते. मात्र, काही वेळातच अंगाला बांधलेले कॅन काढल्याने तो बुडू लागला. यावेळी त्याच्या मित्रांनी अलोकला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्याला तात्काळ सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे