Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2964

सातारा जिल्ह्याचा 565 कोटी 88 लाखाच्या आराखड्यास मंजूरी : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Balasheb Patil

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सातारा जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी सन 2022-23 साठीच्या कमाल नियतव्यय मर्यादेनुसार रु. 314 कोटी 42 लक्षच्या आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली तसेच, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत रु. 79 कोटी 83 लक्ष आणि आदिवासी घटक कार्यक्रम बाह्य क्षेत्रसाठी रु. 1 कोटी 63 लक्षच्या प्रारूप आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली. अशा एकूण सातारा जिल्ह्याच्या रु. 395 कोटी 88 लक्षच्या तसेच 170 कोटी वाढीव निधीसह 565 कोटी 88 लक्ष रुपयाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली.

मंत्री बाळासाहेब पाटील म्हणले, राज्यस्तरावरील बैठक 21 जानेवारीला होत आहे. अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आराखड्यात वाढ करण्याचा निर्णय झाला. बैठकीत चर्चा होत असताना अलीकडच्या काळात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात सध्या असलेली बेडची व आॅक्सिजन बेडची परिस्थिती तसेच व्हेटींलेटरची माहिती घेण्यात आली.

सध्या रूग्णसंख्य़ा वाढत असली तरी अॅडमिट होणाऱ्याची संख्या अगदीच कमी आहे. सातारा जिल्ह्यात फलटण आणि कराड तालुक्यात रूग्णसंख्या वाढत आहे. तेव्हा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी अशी विनंती मी माध्यमांच्या माध्यमातून करत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

धक्कादायक ! पत्नीचा गळा दाबून शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | सततची नापीकी आणि कर्जाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात येणाऱ्या पुयनी येथे घडली आहे. रंगनाथ हरीभाऊ शिंदे वय ४५ , सविता रंगनाथ शिंदे वय ४० असे पुयनी येथील मृत पती पत्नीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मयत रंगनाथ शिंदे यांना चार ते पाच एकर कोरडवाहू जमीन आहे . मात्र खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि सततची नापीकी , दुबार पेरणीचे संकट , त्यांच्याकडे असलेल्या कर्जामुळे ते विंचनेत होते . अखेर त्यांनी रविवार ९ जानेवारी रोजी रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास पत्नी सविता शिंदे या गाढ झोपेत असताना गळा दाबुन हत्या केली.

त्यानंतर शेतकरी रंगनाथ शिंदे यांनी घरातील माळवदाच्या लाकडी सरीला गळफास घेऊन आत्महत्या केली . दरम्यान शेतीची कामे करण्यासाठी शेतकरी रंगनाथ शिंदे यांनी दोन बैल घेतले होते . त्याच बरोबर शेतीला जोडधंदा म्हणून एक म्हैस घेतली होती . मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळेसोयाबीन , तूर , मुग हातचे गेले गेल्याने त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या घटनेमुळे पुयनी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .

केंद्राचा इशारा – “वाढू शकेल हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या, ऍक्टिव्ह प्रकरणांवर ठेवा लक्ष”

नवी दिल्ली । भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने दार ठोठावले असून, त्यामुळे कोरोना संसर्गामध्ये मोठी झेप घेतली आहे. आठवडाभरापूर्वी जिथे कोविडची सहा ते दहा हजार प्रकरणे नोंदवली जात होती, तिथे आता ही संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही अनियंत्रित वेगाने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत इशारा दिला आहे. ते म्हणाले की,”कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्याही वेगाने वाढू शकते, त्यामुळे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवले पाहिजे.”

महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल यासह देशभरात कोरोनाची परिस्थिती अनियंत्रित होत आहे. रविवारी देशभरात सुमारे 1 लाख 80 हजार रुग्ण आढळले. कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, सोमवारी केंद्राने राज्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर पत्र लिहिले आहे. पत्रात राज्यांना कोविडच्या वाढत्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

केंद्रीय सचिव राजेश भूषण म्हणाले की,”सध्या समोर आलेल्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये एकूण ऍक्टिव्ह प्रकरणांपैकी केवळ 5 ते 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे.” परिस्थिती झपाट्याने बदलत असून दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा इशारा त्यांनी दिला. ही परिस्थिती कायम राहिल्यास रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू शकते, असे सचिवांनी सांगितले.

गुणरत्न सदावर्तेंमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली

Gunaratne Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुणरत्न सदावर्ते यांची वकील म्हणून नेमणूक करून मोठी चूक केली असे म्हणत सदावतेंच्या आक्रस्ताळेपणामुळे कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे. असा आरोप अशी संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक पार पडली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला.

कृती समितीचे सदस्य अजय गुजर म्हणाले, सदावर्ते यांना आपण पत्र लिहिलं असून त्यात आता तुम्ही आमची बाजू मांडण्याची गरज नसल्याचं सांगितलं. आम्ही त्यांची वकील म्हणून नेमणूक करून मोठी चूक केली. आता चूक सुधारून नवीन वकील नेमले आहेत. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सतीश पेंडसे हे नवीन वकील नेमले असल्याचं गुजर यांनी सांगितले.

एसटी कृती समितीचे सदस्य सुनिल निर्भवणे यांनी देखील गुणरत्ने सदावर्ते यांच्यावरजोरदार टीका केली. सदावर्ते स्वतः डिप्रेशनमध्ये असावेत त्यामुळे लोकांना भडकावण्याचं काम सुरु आहे. सदावतेंच्या आक्रस्ताळेपणामुळे कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे. असा आरोप त्यांनी केला.

कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात ! दोघे गंभीर जखमी तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर- नांदेड रोडवर खरबी शिवारात हा भीषण अपघात घडला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन पोलीस पोलीस कर्मचाचारी गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात दीपक जाधव आणि ईश्वर राठोड या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले, तर प्रितेश इटगाळकर आणि सदानंद सपकाळ हे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

दोन्ही जखमी पोलीस अधिकाऱ्यांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंधारात उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडला आहे.

मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला, उड्डाणासाठी पुशबॅक घेऊन जाणाऱ्या वाहनाला लागली आग

मुंबई । मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. सोमवारी प्रवाशांनी भरलेल्या एअर इंडियाच्या विमानासाठी पुशबॅक घेऊन जाणाऱ्या वाहनाला अचानक आग लागली. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. मात्र, लवकरच आग आटोक्यात आली. त्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तसेच, विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. हे विमान मुंबईहून जामनगरला जात होते. मात्र या घटनेनंतर विमानाने दुपारी 12.04 वाजता उड्डाण घेतले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअर इंडियाचे फ्लाइट AIC-647 जे मुंबईहून जामनगरला जात होते. या विमानाला धक्का देत वाहनाला अचानक आग लागली. अपघात झाला तेव्हा विमानात 85 प्रवासी होते. मात्र, विमानतळावर उपस्थित असलेल्या ग्राऊंड स्टाफने समजूतदारपणा दाखवत आग आटोक्यात आणली. या घटनेत विमानाचे तसेच प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नाही ही दिलासादायक बाब होती.

वास्तविक पुशबॅक वाहन हे उड्डाणाला धक्का देण्यासाठी एक वाहन आहे आणि ते एअर इंडियाच्या फ्लाइटला पुशबॅक करण्यासाठी आणण्यात आले होते मात्र उड्डाण जवळ येताच त्याला आग लागली. आग नेमकी कशी लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. सध्या विमानतळ प्राधिकरणानेही याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

मात्र , टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, पुशबॅक वाहन इंधन भरल्यानंतरच परत आले होते. यादरम्यान, विमान दोनदा व्यस्त झाले आणि अचानक आग लागली.

शरद पवार हे काळजी वाहू मुख्यमंत्री आहेत का?; गुणरत्न सदावर्ते यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. यावर अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “आजची जी बैठक झाली ती लाजिरवाणी होती. एसटीच्या विलीनीकरणाची ज्या ६७ जणांनी हुतात्म्य पत्करले. त्याच्या मृत्यूबाबत पवारांनी आज साधा ब्र शब्दही काढला नाही. शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे काय? असा सवाल करीत सदावर्ते यांनी पवारांवर निशाणा साधला.

अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपले जीव घालवले त्यांच्याबद्दल काहीही बोलले नाहीत. शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब हे मुख्यमंत्र्यांकडे का गेले नाही? ते का शरद पवार यांच्याकडे गेले.

माझ्याकडे 75 हजार कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही काहीही काळजी करू नये. शरद पवार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे आयपीएलच्या खेळाप्रमाणे बघत आहेत. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक मृत्यूला शरद पवारही जबाबदार असतील. आजच्या बैठीकीतील चित्र पाहता चर्चा करण्यासाठी गेलेले युनियनचे लोक आधी शरद पवारांकडे बघत होते. आणि मग स्तुतिसुमनं उधळत होते आम्ही दुखवट्यामध्ये आहोत, अशी टीकाही यावेळी सदावर्ते यांनी केली

ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी मंत्री, आमदारांना आवाहन…

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 

भारतात सर्वात मोठ्या संख्येने असणारा समूह म्हणजे “ओबीसी”. ७३ व ७४ च्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यात १९९४ साली प्रथमच ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात आले व त्यानंतर २०१० ला कृष्णमूर्ती यांच्या निकालाने घटनेच्या २४३ व्या कलमात दुरुस्ती करून हे आरक्षण वैध ठरविण्यात आले. परंतु त्यावेळी आरक्षणाची अंमलबजावणी करताना ३ कसोट्यांचे पालन करणे बंधनकारक ठरवले. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाज घटकाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, रोजगार, आरोग्यविषयक मागासलेपण सिद्ध करण्याची आकडेवारी म्हणजेच इम्पिरिकल डेटा जमा करून मागासवर्ग आयोगाकडून येणेची होती.

डेटा जमा करण्याचे हे काम राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाकडे २९ जून २०२१ ला सोपवले परंतु या आयोगाला ना निधी, ना जागा, ना कर्मचारी दिले त्यामुळे हे काम होऊ शकले नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना इम्पिरीकल डेटा नाही तर आरक्षण नाही निर्णय घेतला त्यामुळे महाराष्ट्रातील ५६ हजार ओबीसी भटके यापासून वंचित राहिले. महाराष्ट्र सरकारमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. असंघटित ओबीसी व भटके विमुक्त यांचा घटनात्मक हकक हिरावला जातोय याला सर्वस्वी जबाबदार एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, विजय वड्डेटीवर हे आहेत.

त्याचबरोबर केंद्रातील भाजपा सरकार केंद्रात सत्ता आलेपासून २०११ साली तत्कालीन सरकारने ५ हजार कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेला इम्पिरिकल डाटा दाबू पाहत आहे.ओबीसी डेटाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या अरविंद पनगारिया समितीवर मागील पाच वर्षांत एकही सभासद नेमला नाही.

‘या’ महानगरपालिकेकडून प्रिकॉशन डोस (बूस्टर) द्यायला सुरवात, 84 हजार लाभार्थ्यांना मिळणार डोस

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ।

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून प्रिकॉशन डोस ( बूस्टर) द्यायला सुरवात झाली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेने योग्य नियोजन केले आहे.

सांगली महापालिकेच्या 10 आरोग्य केंद्रात प्रिकॉशन डोस देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये ज्यांचा सेकंड डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले आहेत अशा 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. तसेच सेकंड डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेल्या फ्रंटलाईन आणि हेल्थकेअर वर्करना सुद्धा तिसरा प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे.

सांगली महापालिका क्षेत्रात 84 हजार लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोस दिला जाणार असून महापालिका आरोग्य केंद्रात प्रोकॉशन डोस देणेचे काम सुरू झाले आहे. 60 वर्षावरील नागरिकांनी तसेच फ्रंटलाईन आणि हेल्थ केअर वर्कर यांनी आपला सेकंड डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले असल्यास हा डोस घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हातावरील मेहंदी उतरण्यापूर्वीच जोडप्याचा टोकाचा निर्णय; दांपत्याचा भयावह शेवट

परभणी – जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका नवविवाहित दाम्पत्याने भयावह पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. शनिवारी रात्री त्यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. रविवारी सकाळी दोघंही आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले आहेत. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. गंगाधर विश्वनाथ चापके (वय-25) आणि सपना गंगाधर चापके (वय-21) असं मृत पावलेल्या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे. ते पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील रहिवासी होते.

आठ महिन्यांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. पण काल सकाळी दोघंही मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. आत्महत्येच्या कारणाचा शोध पूर्णा पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभर दोघंही पती पत्नी घरीच होते. पण रविवारी सकाळी दोघंही झोपेतून उठले नाहीत. त्यामुळे आजूबाजूच्या नातेवाईकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांच्याजवळ जाऊन पाहणी केली असता, दोघंही मृतावस्थेत आढळले आहेत. तसेच त्यांच्या मृतदेहाशेजारी विषारी औषधाची बाटली आढळली आहे.

संबंधित प्रकार उघडकीस येताच गावकऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. प्राथमिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पूर्णा पोलीस करत आहेत.