Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2994

दुप्पट वाढ : सातारा जिल्ह्यात 189 पाॅझिटीव्ह, तर रेट 7. 45 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 189 जण बाधित आढळले आहेत. तर दोनजण ओमायक्रोन बाधित आढळले आहेत. आतापर्यंत जिह्यात एकूण 8 ओमायक्रोन बाधितांची संख्या झालेली आहे. कोरोना बाधितांचा आकडा हा कालपेक्षा दुप्पट झाला आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 534 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 189 लोक बाधित आढळून आले आहेत. तपासणी पॉझिटिव्ह रेट हा कालच्यापेक्षा दुप्पट झालेला आहे. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 7. 45 टक्के आला आहे.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात आलेल्या अहवालात कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात परदेशातून आलेल्या एकाला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या एका निकटवर्तीय यांनी ओमायक्रोनची लागण झाली आहे.

कराड एसटी कर्मचाऱ्यांची पदयात्रा : स्व. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ ते मुंबई उद्या प्रस्थान

कराड | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह विलीनीकरणाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 65 कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यासाठी येथील प्रीतिसंगमवरून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत कराड आगारातील एसटी कर्मचारी पदयात्रा काढणार आहेत. त्यानुसार उद्या गुरुवारी 6 रोजी सकाळी 11 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून या पदयात्रेचे मुंबईकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती पदयात्रा प्रतिनिधी पी. एस. सकपाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी राज्यभरासह कराड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आज जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळ आणि राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला. तसेच कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पगारवाढ देत एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मुख्य मागणीला बगल दिली आहे. मात्र, विलीनीकरणाच्या लढ्यात आत्तापर्यंत राज्यभरातील जवळपास 65 एसटी कर्मचारी हुतात्मा झाले आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय एसटी कर्मचारी बेमुदत संप मागे घेणार नाहीत.  विलीनीकरणाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 65 कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यासाठी कराड आगारामधील एसटी कर्मचारी प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत पदयात्रा काढणार आहेत. गुरुवारी 6 रोजी सकाळी 11 वाजता प्रीतिसंगमावरून या पदयात्रेस सुरुवात करण्यात येणार असून ही पदयात्रा आठ ते दहा मुक्कामांनंतर अंदाजे 16 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धडकेल, असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या प्रसिद्धीपत्रकावर पदयात्रा प्रतिनिधी पी. एस. सकपाळ यांच्यासह चालक डी.ए. पवार, चालक जावेद मुल्ला, वाहक संजय लावंड आणि चालक सुहास शिवदास यांची नावे व सह्या आहेत. या अर्जाची प्रत जिल्हा पोलीस प्रमुख, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, रा.प. विभाग नियंत्रक सातारा, पोलीस निरीक्षक कराड, तहसीलदार आणि प्रांताधिकारी कराड यांना देण्यात आल्या आहेत.

दारु पिऊन कुटुंबाला त्रास देणाऱ्या भावाचा सख्या भावाने काढला ‘काटा’

murder

औरंगाबाद – दारू पिऊन कुटुंबाला त्रास देणाऱ्या भावाला मित्रांच्या मदतीने दोरीने गळा आवळून सख्या भावानेच खून केल्याची घटना जिल्ह्यातील सिल्लोड शहरात उघडकीस आली आहे. अमोल रोहिदास वानखेडे (24) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत अमोलचा भाऊ गणेश रोहिदास वानखेडे (21) व मित्र सुमित विजय सुतार (21) यांना औरंगाबादेतून अटक केली आहे. याशिवाय तिसरा आरोपी वैभव वव्हाळ हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

मयत अमोलला दारूचे व्यसन लागले होते‌. त्यामुळे तो दररोज दारू पिऊन आई व भावाला तसेच कुटुंबातील लोकांना त्रास देत होता. त्या घटनेला कंटाळून गणेश ने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने आपल्या सख्ख्या भावाचा गळा आवळून खून केला. ही घटना 7 डिसेंबर रोजी घडली होती. त्यानंतर गणेशने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून मित्र सुमित च्या मदतीने दुचाकीवरून मृतदेह मोत्याचा टाकून औरंगाबाद जवळील रांजणगाव येथील दुसरा मित्र वैभव याच्या मदतीने येथील एका पडक्या घरात नेऊन ठेवला होता.

त्यानंतर रांजणगाव पोलिसांना 1 जानेवारी रोजी बेवारस स्थितीत कुजलेल्या अवस्थेत प्रेत सापडले होते. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. प्रेत इतके कुजले होते की त्याची ओळख पटवणे पोलिसांना अवघड झाले होते. अखेर आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले व प्रेताची ओळख पटली.

विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिले ‘या’ शब्दात प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा चार्ज हा दुसल्याकडे देण्याची मागणीही केली जात आहे. याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी “माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचे आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. असे प्रत्युत्तर देत पदाधिकाऱ्यांनो तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा मी वेळीच माझ्या कामाने माझी पोहोचपावती देतो.

मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या बैठकीस मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख ,नगरसेवक आमदार, खासदार यांनी उपस्थिती लावली होती. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा असे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. तसेच मुंबई महापालिकेने मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराव्हीच्या घेतलेला निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या.

परिस्थितीचा अंदाज घेऊन शहरातील शाळांबाबत निर्णय

औरंगाबाद – मुंबईत दररोज 8 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने तेथील मनपा प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात मंगळवारी 87 कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आम्ही परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोत. लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊ अशी माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आधी ग्रामीण भागातील शाळा उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद शहरातील ही शाळा उघडण्याची परवानगी देण्यात आली. शाळा सुरू होऊन महिना ही झालेला नसताना पुन्हा कोरोना चा उद्रेक सुरू झाला आहे.

चार दिवसांपासून शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत. मंगळवारी रुग्ण वाढीचा अचानक उद्रेक झाला. त्यासंदर्भात प्रशासक पांडेय यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले.

सहकार मंत्र्यांच्या ‘सह्याद्रि’स उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाबद्दल पुरस्कार

Saydri Suger

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास 2019-20 या सालाकरीता उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, ऊस, साखर व इथेनॉलवर संशोधन करणार्‍या व साखर कारखानदारीस तांत्रिकसह सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणार्‍या, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या संस्थेने जाहीर केला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे सन 2019-20 सालाचे आडिटेड जमाखर्च पत्रकांची छाननी करून सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहीर केलेला आहे.

त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा प्रति क्विंटल साखरेस आलेला रोखीचा उत्पादन खर्च रूपये 366.30 इतका असून तो राज्याच्या सरासरी प्रति यिवंटल रोखीच्या उत्पादन खर्च रू.496.83 पेक्षा मोठ्या फरकाने कमी, तर साखर उत्पादन प्रक्रियेचा खर्च रूपये 813.75 प्रति यिवंटल असून तो ही राज्याच्या सरासरी साखर उत्पादन प्रकियेचा एकूण खर्च रूपये 851.23 पेक्षा कमी असल्याचे छाननीत दिसून आले. तसेच कारखान्याच्या नयत मुल्य/भांडवलाच्या पाया निर्देशांकात भरीव वाढ झाल्याचेही दिसून येत असल्याची वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने नोंद घेतली आहे. यासह विविध निकषांच्या आधारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांनी कारखान्यास प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहिर केलेला आहे.

कारखान्याचे चेअरमन, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री मा.नामदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या नियोजनबद्द मार्गदर्शनाखाली, कारखान्याने केलेल्या काटकसरीच्या कारभारामुळे कारखान्यास यापूर्वीही सन 2011-12, 2012-13, 2015-16 आणि 2016-17 या सालात देशपातळीवरील उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचे पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह नवी दिल्ली या संस्थेकडून प्राप्त झाले आहेत. यापूर्वीही सन 2015-16 या सालाकरीता वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार देवून गौरविलेले आहे. यासह कारखान्यास देशातून सर्वाधिक साखर निर्यातीचा पुरस्कार, उच्च तांत्रिक क्षमता पुरस्कार, ऊस विकास पुरस्कार असे अनेक पुरस्कार कारखान्यास यापूर्वी मिळालेले आहेत. सभासदांच्या हितासाठी व प्रगतीकरीता कारखाना व्यवस्थापन सातत्याने काटकरसरीचे प्रयत्न करीत आहे. सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते लवकरच होणार आहे. कारखान्यास जाहीर झालेल्या उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराबद्दल कारखान्याचे चेअरमन मा.नामदार बाळासाहेब पाटील, व्हा.चेअरमन सौ.लक्ष्मी गायकवाड व सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

पाटण नगरपंचयात निवडणूक : सोमवारी चित्र स्पष्ट होणार, छाननीत 36 अर्ज वैध

Patan Nagerpanchayt

पाटण | पाटण नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी दाखल झालेल्या 42 उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी शांततेत पार पडली. यामध्ये 6 अर्ज अवैध आणि 36 अर्ज वैध ठरले आहेत. यानंतर 10 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे, असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनील गाढे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली.

पाटण नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मंगळवारी झालेल्या छाननीमध्ये प्रभाग तीनमधून भाजपाचे विद्यमान नगरसेवक सागर माने व राजेंद्र माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सागर माने यांना मिळाल्याने राजेंद्र माने यांचा अर्ज अवैध ठरला. प्रभाग दहामध्ये शिवसेना तथा राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई गटाकडून अभिजीत यादव व अनमोल पाटील यांच्यापैकी अभिजीत यादव यांना एबी फॉर्म मिळाल्याने अनमोल पाटील यांचा अर्ज अवैध ठरला. प्रभाग तेरामध्ये सेनेच्या ना. देसाई गटाकडून सौ. वनिता पवार व सौ. हकिम यांच्यापैकी सौ. सुलताना हकिम यांना एबी फॉर्म मिळाल्याने सौ.वनिता पवार यांचा अर्ज अवैध ठरला.

याच प्रभागातून राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केलेल्या सौ. श्रद्धा कवर यांचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत अर्ज वैध ठरल्याने त्यांचा अपक्ष अर्ज अवैध ठरला. प्रभाग दहामध्ये सुधीर पाटणकर व किशोर गायकवाड यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोघांचे प्रत्येकी एक अर्ज वैध ठरवून दुबार अर्ज अवैध ठरले. या चार प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत 10 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत असून त्यानंतरच प्रत्यक्ष निवडणूक दुरंगी, तिरंगी, चौरंगी की बहुरंगी याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रात लागणार मिनी लॉकडाऊन?; ‘असे’ असतील निर्बंध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन लावण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. दरम्यान आज मुंबईत राज्यातील मंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीत राज्यपातळीवर निर्बंध आणि नियमावली जारी करण्याबाबत चर्चा केली जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार आहेत.

मुंबईत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीस सुरुवात झाली आहे. या बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत मिनी लॉकडाऊन लावण्या संदर्भात चर्चा केली जात आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

देशात ओमिक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाचे संकट वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत. आता पश्चिम बंगाल, हरियाणामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेज, सलून, उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही 50 टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. बंगालमध्ये मिनी लॉकडाउन करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन लावण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे.

शनिवार, रविवार कडकडीत बंद राहणार

आज होत असलेल्या बैठकीत राज्यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुक्रवार पर्यंत राज्य सरकारच्या नियमावलीनुसार काही गोष्टी सुरु राहणार आहेत. मात्र, शनिवार आणि रविवार कठोर निर्बंध असणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद करण्याची शक्यता आहे. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहण्याची शक्यता आहे.

काय सुरु, काय बंद असण्याची शक्यता –

– रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत रात्रीची संचारबंदी,
– गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार
– मॉल, बार, रेस्टॉरंट वेळात बदल करण्याचा निर्णय,
– सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार
– राज्यातील चित्रपटगृहे 50 टक्के परवानगीने
– 50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
– अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
– राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहणार
– शाळा महाविद्यालये बंद
– दुकाने सकाळी दहा ते रात्री 10 या वेळेत सुरु राहतील
– रेस्टॉरंट्स, बार 50 टक्के क्षमतेने सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार

सराफा दुकानातून हिरेजडित बांगडी चोरणारी ‘ती’ बुरखाधारी महिला जेरबंद

औरंगाबाद – जालना रोडवरील एका सोन्या-चांदीच्या दुकानातून शनिवारी 1 लाख 42 हजार यांची हिरेजडित सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या बुरखाधारी महिलेला काल जिन्सी पोलिसांनी अटक केली असून, तिच्याकडून बांगडी जप्त करण्यात आली आहे. शबाना बेगम उर्फ शब्बो शेख जलील (30) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

जिन्सी पोलिसांनी सांगितले की, मलबार गोल्ड अँड डायमंड या सोन्या-चांदीच्या दुकानात एक बुरखाधारी महिला खरेदीच्या निमित्ताने आली होती. यावेळी सेल्समन अशोक अंकुश गायकवाड हे त्यांना दागिने दाखवत होते. घाई असल्याचे सांगून त्या महिलेने गायकवाड यांची नजर चुकून 24 ग्रॅम 500 मिली ग्रॅमची सोन्याची बांगडी चोरून नेली होती. नंतर ती रिक्षात बसून पळून गेली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले. तेव्हा चोरी शंब्बोने केल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर गोकुळ ठाकूर, सहाय्यक फौजदार संपत राठोड, पोलीस नाईक नंदुसिंग परदेशी, सुनील जाधव, नंदलाल चव्हाण, संतोष बनावत यांच्या पथकाने तिची चौकशी केली. मात्र ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. मग रिक्षाचालकाला पोलिसांनी शोधून काढले. तेव्हा त्याने तिला ओळखले पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली देऊन बांगडी काढून दिली.

औषधे डिलीव्हरी देण्यासाठी आलेल्या एकाने 2 लाख 10 हजार केले लंपास

Satara Taluka Police

सातारा | खिंडवाडी (ता. सातारा) येथील वृद्धाच्या घरातून एटीएम चोरून दोन लाख दहा हजार रुपये काढणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. अजित पांडुरंग नांगरे (वय -36, रा.भादुले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबत शिवाजी साहेबराव चव्हाण (वय- 65) यांनी फिर्याद नोंदविली होती. 21 डिसेंबरला त्यांच्या घरातून युनियन बँकेचे एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीने चोरून नेले. त्यानंतर त्यांच्या बँकेच्या खात्यातून तब्बल 2 लाख 10 हजार रुपये काढण्यात आले.

बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यावर खात्यातून दोन लाख रुपये काढले गेल्याचे त्यांना बँकेने सांगितले. त्यानंतर त्यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. उपनिरीक्षक कदम या गुन्ह्याचा तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी चव्हाण यांच्याकडे चौकशी केली. त्यावरून नांगरे याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्याला भादुले या गावातून अटक केली. पोलिस कोठडीमध्ये केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून एटीएम व 1 लाख ८० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. तो चव्हाण यांच्या घरी आयुर्वेदीक औषधे देण्यासाठी आला होता. त्यांच्या वृद्धत्वाचा फायदा घेत त्याने एटीएम लंपास केले होते. पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर व वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक समीर कदम, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, अभय साबळे, पंकज ढाणे, विक्रम माने, संतोष कचरे, सागर गायकवाड, गणेश घाडगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.