Thursday, December 11, 2025
Home Blog Page 3709

औरंगाबाद येथे ‘महाज्योती’चे विभागीय कार्यालय सुरू करावे – विजय वडेट्टीवार

waddetiwar

औरंगाबाद – मागास व आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळण्यासाठी शिष्यवृत्त्या, शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षण, इंग्रजी शाळेतील प्रवेशाबाबत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्त्यांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी काटेकोर तपासणी करण्याचे आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले. आश्रम शाळेच्या व विभागातील आपत्ती व्यवस्थापन आढावा विषयक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उपायुक्त पराग सोमण, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख, औरंगाबादचे सहायक आयुक्त पी.जी.वाभळे, बीडचे सहायक आयुक्त सचिन मडावी, जालन्याचे सहायक आयुक्त अमित घवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.एम.केंद्रे, सहायक संचालक शि.बा.नाईकवाडे, लेखा अधिकारी डॉ.सुधीर चाटे आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्तांना महाज्योतीच्या विभागीय कार्यालयासाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश वडेट्टीवार यांनी दिले. बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळेचा आढावाही यावेळी त्यांनी घेतला. तसेच इंग्रजी भाषेतील परिपूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेत इतर मागासवर्गीया विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाच्या सहकार्याने पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित व्हावा जेणेकरुन इंग्रजी माध्यमाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळेल. यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी समाज कल्याण विभागामार्फत करावी असे आदेशही यावेळी अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ठिकाणी इतर मागास प्रवर्गातील 100 विद्यार्थी संख्येचे वस्तीगृह तातडीने उभारण्याबाबत जागा आणि सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही संबंधितांना वडेट्टीवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी प्रास्ताविकात मराठवाड्यात आठही जिल्ह्यातील धरणांची पाणी क्षमता, शेतकरी आत्महत्या, गेल्या वर्षीच्या अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत तपशिलवार माहिती व यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी, तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने विभागाने केलेल्या तयारी बाबतचा आढावा सादर केला. यामध्ये ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन निर्मिती क्षमता, लहान मुलांचे लसीकरण, कोविड उपचार याबाबत प्रशासनाची तयारी बाबत माहिती दिली.

पर्यटन आणि मूलभूत विकास कामासाठी निधी द्या – चंद्रकांत खैरे

chandrakant khaire

औरंगाबाद : औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. देशभरासह इतर देशातीलही पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी व मूलभूत विकास कामासाठी निधी द्या अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीत पर्यटन मंत्री व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे.

चंद्रकांत खैरे यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी, राज्यमंत्री अर्जुनराम मेघावाल, पर्यटन सचिव राघवेंद्र सिंग, भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालक व्हि. विद्यावती यांची भेट घेत पर्यटन वाढीसासाठीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महामार्ग सोबतच वेगवेगळ्या कामांचा पाठपुरावा केला आणि त्याला गती देण्याची ही विनंती केली. त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांनी दिलेल्या निवेदनात बीबीका मकबरा, देवगिरी किल्ला, अजिंठा, वेरूळ येथे रोप – वे, लाईट अँड साऊंड शो या सर्व बाबी पर्यटन विकास योजनेत नमूद केल्या आहे.

औरंगाबादेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता बीबी का मकबरा, अजिंठा-वेरूळ लेणी या ठिकाणी जगभरातील पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून येथे जागतिक स्तरावर सुविधा देणे गरजेचे आहे. वर नमूद केलेल्या बाबी सुरु करण्यात आल्या तर पर्यटक आर्कर्षित होतील. त्याचबरोबर हे प्रकल्प इथे उभारणे गरजे असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी पर्यटन मंत्री आणि त्या विभागाच्या निदर्शनास आणून देत वरील मागण्या व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

व्यवसायासाठी माहेरहून पैसे आण म्हणत, पत्नीचा अमानुष छळ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

rape

औरंगाबाद : माहेराहून व्यवसायासाठी पैसे आण म्हणत हातापायाला व तोंडाला चटके देऊन एका २८ वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार वाळूज परिसरात समोर आला आहे. तसेच पत्नी व सासूला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, सदर महिला शाहिस्ता हिचे लग्न वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथील शेख अफसर शेख अमीर याच्या सोबत १७ जुन २०१० रोजी झाला होता. त्यानंतर दोन वर्ष त्यांचा सुखी संसार होता. तो दारूही प्यायचा. मात्र काही दिवसानंतर अफसर शेख याने वारंवार माहेरहून पैसे आणण्यास सांगायचं पत्नीने पैसे आणूनही दिले. मात्र त्याला लालुच लागल्याने त्याने पुन्हा पैसे मागितले. वेळोवेळी होत असलेल्या या पैशांच्या मागणीमुळे शाहिस्ता हिने पैसे आणण्यास नकार दिला.

त्यामुळे अफसरने शाहिस्ताला मारहाण करून हातापायाला व तोंडला चटके देऊन घरातून हाकलून दिले. त्यामुळे शाहिस्ता ही माहेरी गेली. त्यांनतर अफसर हा माहेरी जाऊन तिला मारहाण केली. तसेच तिला नांदायला पाठवा. असे म्हणून सासु व पत्नी दोघींनाही ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये तक्रार केल्याने त्यांच्यात समेट झाली. त्यांनतर एक महिना तिला व्यवस्थित नांदविले. मात्र त्यांनतर पुन्हा पैसे घेऊन ये असा तगदा लावला. अखेर तिने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटलांनी मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावे; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवारांना माढ्यातून घरी पाठवलं अस वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली आहे .चंद्रकांत पाटलांनी मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावे अशी टीका अमोल मिटकरींनी केली.

चंद्रकात पाटलांना माझी एक लहान भाऊ म्हणून विनंती आहे की, मानसोपचार तज्ज्ञाला दाखवा. कारण हल्ली त्यांनी केलेलं हे वक्तव्य मानसिक संतुलन ढासळल्याचे प्रकार आहेत, असे अमोल मिटकरी यांनी म्हंटल. चंद्रकांत पाटलांना पदवीधर मतदार संघात पळता भूई थोडी झाली आणि कोल्हापूरकरांनी तिथून हाकलल्यामुळं तुम्हाला कोथरूडसारखा मतदारसंघ शोधावा लागला, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

राजकारणातील छक्के पंजे तुम्हाला जरूर कळत नसतील पण हेलिकॅप्टर शाॅट मारून मॅच कशी जिंकायची हे पवार साहेबांना कळतं. त्यामुळे पवार साहेबांना आणि राष्ट्रवादीला संपवण्याचा चुकूनही विचार मनात आणू नका. हे विचार मनात आणता आणता तुम्ही किती संपताय हे लोकांच्या लक्षात येताय, अशी टीका देखील मिटकरींनी केली आहे.

औरंगाबाद: तीस कोरोना रुग्णांची नव्याने भर, दोघांचा मृत्यू

Corona

औरंगाबाद – कोरोना संसर्ग शहरात सध्या थोड्या प्रमाणात असला तरी, ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासात शहरात फक्त सात नवीन रुग्णांची भर पडली. तर ग्रामीण भागात 23 रुग्ण वाढले दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी 25 जणांना (मनपा7 ग्रामीण 18) सुट्टी देण्यात आली. आज पर्यंत 1 लाख 43 हजार 770 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 30 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 47 हजार 581 झाली आहे.

आजपर्यंत एकूण 3 हजार 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी वैजापूर तालुक्यातील मनोर येथील 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा घाटीत तर वैजापूर तालुक्यातील वीरगाव येथील 51 वर्षे रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सध्या 300 रुग्णांवर उपचार सुरू आहेत असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

कोण होणार करोडपती : सुपनेच्या स्वाती शिंदे यांनी जिंकले 6 लाख 40 हजार रूपये

कराड | कराड तालुक्यातील सुपने गावच्या स्वाती मारुती शिंदे यांनी एका वाहिनीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात सहभागी होऊन 6 लाख 40 हजार रूपये बक्षीस जिंकले. स्वाती शिंदे या फार्मासिस्ट आहेत. सध्याच्या कोरोनाच्या महामारीत फार्मासिस्ट हे अत्यावश्यक सेवेत काम करत होते. मात्र त्याच पध्दतीने शासनाने फार्मासिस्ट यांना लसीकरणात प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत स्वाती शिंदे यांनी सांगितले.

कोण होणार करोडपती’ शो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या शोत अनेक नामांकित दिग्गजांनी हजेरी लावत जिंकलेल्या रक्कमेतून सामाजिक कार्याला हातभार लावला आहे. ‘कोण होणार करोडपती’ या मंचावर कराडजवळील सुपनेच्या फार्मासिस्ट स्वाती शिंदे यांनीही प्रश्नांची उत्तरे देत रक्कम जिंकली आहे. या कार्यक्रमांचे संचालन सचिन खेडेकर करत आहेत.

या आठवड्यात स्वाती शिंदे हॉट सीटवर खेळायला होत्या. त्यांचे स्वतःचं औषधांचे दुकान आहे. त्यांनी फार्मासिस्ट स्वाती शिंदे यांनी कोव्हिड-19 परिस्थितीत आपलं कार्य कशा प्रकारे सुरू ठेवलं होतं हे सांगितले आहे. स्वाती यांनी 11 प्रश्नांची योग्य उत्तरे देत 6 लाख 40 हजार रूपये जिंकले तर 12 व्या प्रश्नांचे उत्तरांची खात्री नसल्याने त्यांनी खेळ सोडला. परंतु खेळ सोडल्यानंतर 12 व्या प्रश्नांचे उत्तर स्वाती शिंदे यांनी बरोबर दिले.

तुम्ही राजीनामा द्यावा अशीही जनतेची मागणी ; राष्ट्रवादीचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. संपूर्ण देशवासियांचा इच्छा होती म्हणून राजीव गांधी यांचे नाव हटवून मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी मोदींना टोला लगावला आहे.

जनतेची मागणी होती म्हणून नरेंद्र मोदींनी खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदलले, हे चांगल आहे पण जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि राजीनामा द्या, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

आधीच्या सरकारने केलेल्या कामांची नावे फक्त राजकीय द्वेषातून बदलून त्याचे श्रेय लाटण्याची या सरकारची जुनी खोड आहे. तापलेल्या तव्यावर स्वतःची चपाती भाजण्याची सवय भाजपाने आता तरी बदलायला हवी. जनतेच्या आणखीही बऱ्याच मागण्या आहेत त्याकडे देखील प्रधान ‘सेवकांनी’ लक्ष द्यावे, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

चाफळ ग्रामपंचायतीत सत्तांतर : पाटणकर गटाचे अशिष पवार सरपंचपदी बिनविरोध

पाटण | पाटण तालुक्यातील चाफळ गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेनचे लोकनियुक्त सरंपच सूर्यकांत पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. शिवसेनेकडून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे देसाई गटाच्या सरपंचाच्या निधनाने पाटणकर गटाचे सदस्य जादा असल्याने बिनविरोध सत्तांतर झाले.

चाफळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपद रिक्त होते. त्यासाठी पोटनिवडणूक झाली. शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष दत्ताजीराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पाटणचे निवासी नायब तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली. यावेळी विरोधी गट असलेल्या शिवसेनेकडून कोणताही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष पवार यांचा एकच अर्ज दाखल लोकनियुक्त सरपंच सूर्यकांत पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

चाफळमध्ये राष्ट्रवादीकडे पाच तर शिवसेनेकडे चार सदस्य आहेत. बहुमत राष्ट्रवादीकडे असले तरी शिवसेनेचे स्व. सूर्यकांत पाटील हे चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाल्याने सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आली होती. त्यामुळेच या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीबाबत उत्सुकता होती. नवनियुक्त सरपंच आशिष पवार यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, खासदार श्रीनिवास पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, माजी सभापती राजेश पवार यांच्या सहकार्याने चाफळ गावाचा विकास करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

केवळ 31 हजारांसाठी ग्रामपंचायत सदस्यांचा खून : संशयित 12 तासांत कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात

कोरेगाव | कुमठे (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत कॅनॉलनजीक धारदार शस्त्राने व लोखंडी पाईपने मारहाण केल्याने गोळेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश गणपत जाधव (वय- 35) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरेगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासांत तपास करून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. केवळ उसने घेतलेले 31 हजार रुपये परत न दिल्याने खून केल्याचे संशयितांनी कारण सांगितले. या प्रकरणी देवानंद संजय गोरे (वय-18) व कमलेश मधुकर यादव (वय- 18, दोघेही रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, गोळेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश जाधव हे बुधवार दि. 4 ऑगस्टपासून बेपत्ता होते. यानंतर गुरूवारी दि. 5 रोजी कुमठे गावच्या हद्दीत धोम धरणाच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर मंगेश जाधव यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती. डीवायएसपी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विशाल कदम व कर्मचाऱ्यांचे पथक तपास करत होते. या तपास पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या देवानंद व कमलेश यांची नावे निष्पन्न झाली.

पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेवून चौकशी केली. मंगेश जाधव याला देवानंद व मधुकर यांनी 31 हजार रूपये उसने दिले होते. मात्र, वारंवार पैसे मागूनही मंगेश पैसे परत देत नसल्याने मंगेशचा काटा काढण्याचे दोघांनी ठरवले. त्यानुसार दि. 4 रोजी दोघांनी मंगेश याला धोम कॅनॉलच्या बाजूला नेले. याठिकाणी त्याला लोखंडी पाईपने मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले, अशी कबुली दोन्ही संशयितांनी दिली. या कारवाईत पोलिस निरीक्षक अर्चना शिंदे, सपोनि संजय बोंबले, गणेश कड, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सावंत, हवालदार कमलाकर कुंभार, प्रमोद चव्हाण, मिलिंद कुंभार, धनंजय दळवी, अमोल सपकाळ, सनी आवटे, साहिल झारी, सागर गायकवाड, सागर जाधव यांनी सहभाग घेतला.

आ. वरपुडकरांच्या सुनबाईच्या हस्ते शासकीय मदत वाटपाला आ.दुर्राणींचा आक्षेप !

Prerna Varpudkar

परभणी : हॅलो महाराष्ट्र – ( गजानन घुंबरे) – पाथरी विधानसभेचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या सुनबाई यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांच्या मदत वाटपाला विधानपरिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी विरोध दर्शवला असून प्रोटोकॉल नुसार मदत वाटप करावी अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे . आता या आक्षेपाची जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगली आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सोनपेठ,मानवत व पाथरी तालुक्यामध्ये पूरग्रस्त व नैसर्गिक आपत्ती मध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मागील काही दिवसांमध्ये शासकीय मदतीचे धनादेश उपविभागीय अधिकारी , तहसीलदार यांच्याकडून देण्यात आले .मदत वाटपाच्या जवळपास सर्वच ठिकाणी पाथरी विधानसभेचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या सुनबाई सौ . प्रेरणाताई वरपुडकर या सदरील मदत वाटप करताना दिसून आल्या.

या वाटपाचे फोटोही माध्यमामध्ये छापून आलेले पाहायला मिळाले .परंतु हे सर्व घटनाबाह्य या व्यक्तीकडून करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत विधानपरिषद सदस्य व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यासंदर्भात आक्षेप नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान ,धान्य किंवा आर्थिक मदतीचे वाटप करताना प्रोटोकॉल नुसार विधानसभेचे सदस्य अथवा विधानपरिषदेचे सदस्य यांच्या उपस्थितीत वाटप करण्यासंदर्भात एक निवेदन 6 ऑगस्ट रोजी परभणीच्या नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना दिले आहे .

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, पाथरी विधानसभा मतदार संघातील पुरग्रस्त , नैसर्गीक आपत्तीग्रस्त व्यक्तींना शासनाकडुन आर्थिक मदत , धान्य वाटप किंवा नैसर्गीक आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत वाटप करण्यात येते . हे शासन अनुदान त्या – त्या मतदार संघाचे विधानसभा सदस्य किंवा विधानपरिषद सदस्य असे लोकप्रतिनीधी असणाऱ्या व्यक्तीकडुन लाभार्थ्यांना वाटप करावे , असा शासन नियम व प्रोटोकॉल आहे . पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आ. सुरेशराव वरपुडकर यांच्या स्वहस्ते असे शासकीय वाटप करण्यात यावे , हा प्रोटोकॉल मान्य आहे . ते स्वत : उपस्थित नसतील तर विधानपरिषद या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य म्हणुन माझ्या हस्ते वाटप व्हावे , हा प्रोटोकॉल आहे . असे असतांना पाथरी विधानसभा मतदार संघातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,हे प्रोटोकॉल व शासन नियमांचा भंग करीत श्रीमती प्रेरणा वरपुडकर यांच्या हस्ते किंवा उपस्थितीत हे शासकीय अनुदान,धान्य किंवा आर्थीक मदतीचे वाटप करीत आहेत, हा नियम भंग आहे.

याकडे आपले लक्ष वेधीत आहे. तरी पाथरी विधानसभा मतदार संघातील कोणत्याही आपत्तीग्रस्त / नैसर्गीक आपत्तीत किंवा इतर कोणतेही शासकीय मदत वाटप किंवा इतर कार्यक्रमात विधानसभा सदस्य म्हणुन आ. सुरेशराब वरपुडकर किंवा मी यांच्या शिवाय इतर कोणत्याही घटना बाह्य व्यक्तीकडुन वाटप करण्यात येऊ नये . या नियमभंग व नियमबाह्य प्रकरणी तात्काळ संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व तशा सुचना संबधीतांना देण्यात याव्यात .

कोण आहेत प्रेरणा वरपुडकर ?
आ .दुर्राणी यांनी ज्यांच्या उपस्थित शासकिय मदत वाटपाला आक्षेप घेतला आहे त्या सौ .प्रेरणा वरपुडकर कोण आहेत ? असा प्रश्न वाचकांना पडला असेल तर आ .सुरेश वरपुडकर यांच्या त्या सुनबाई आहेत हे लक्षात आले असेलच . याशिवाय त्या युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आहेत . नुकत्याच झालेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये त्या संचालक म्हणून निवडून आल्या आहेत .सोबतच वरपुडकर कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था यांची देखरेख त्या करतात .मुख्य म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत व त्यानंतरही मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या बांधणीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. आ .सुरेश वरपुडकर यांच्यापेक्षा मतदार संघात प्रेरणा वरपुडकरयांची देखरेख जास्त असते .त्यामुळेच बहुतेक कार्यक्रमांना त्यांची हजेरी असते .नैसर्गिक आपत्ती मदत वाटपामध्ये त्यामुळेच त्या दिसून येत होत्या .नेमकी हिच उपस्थिती आता प्रोटॉकल चा भंग करणारी ठरली आहे.