Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3745

प्रशासक महोदय, स्मार्ट सिटीत स्वहिश्याचे 147 कोटी रुपये तत्काळ भरा-नगर विकास विभाग

Astikkumar pande

औरंगाबाद | स्मार्ट सिटी प्रकल्पात स्वहिश्याचे १४७ कोटी रुपये मनपाने तत्काळ जमा करावेत, असे आदेश नगर विकास विभागाने मनपा प्रशासकांना दिले आहेत. तसेच स्वतः चा हिस्सा न भरता केंद्र व राज्य शासनाच्या हिश्शातून खर्च करणे ही गंभीर आर्थिक अनियमितता आहे. असाही उल्लेख यात आहे.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी स्मार्ट सिटी मिशनमध्ये पाच वर्षांपूर्वी शहराची निवड झाली. यातील केंद्र शासन ५० टक्के आणि राज्य शासन २५ टक्के निधी देणार आहे. तर उर्वरित २५ टक्के निधी महापालिकेला स्वहिस्सा म्हणून टाकावा लागणार आहे. आतापर्यंत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेडला केंद्र शासनाकडून २९४ कोटी आणि राज्य सरकारकडून १४७ कोटी रुपये असा एकूण ४४१ कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. यात महापालिकेने स्वहिश्शाचे १४७ कोटी रुपये टाकणे बंधनकारक होते.

परंतु महापालिकेने सुरूवातीपासूनच त्याकडे दुर्लक्ष केले. स्वहिश्याची रक्कम न टाकता शासनाकडून प्राप्त निधी खर्च करण्यात आला. यावर महिनाभरापूर्वी स्मार्ट सिटीचे मेंटॉर बलदेवसिंह यांनी तीव्र नाराजी दर्शवत महापालिकेला स्वहिस्सा तातडीने जमा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर महापालिकेने ६३ कोटी रुपयांचा निधी जमा केला. परंतु अजूनही मोठा वाटा बाकी आहे. त्यामुळे राज्याच्या नगर विकास खात्याकडून मनपा प्रशासकांना याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. नगर विकास खात्याचे सहसचिव पी. जी. जाधव यांनी हे पत्र पाठवले आहे.

मनपा प्रशासकांचा सायकल दौरा; खाम नदीला दिली भेट

Astik kumar pandey

औरंगाबाद | शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोणताही फौजफाटा न घेता सायकलवर स्वार होऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडे नागरिकांच्या मूलभूत सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी औरंगाबादेतील ऐतिहासिक खाम नदीला भेट देत त्याठिकाणी असलेल्या नागरिकांची विचारणा केली.

मनपा प्रशासक पाण्डेय यांनी खामनदी विकास कामाची पाहणी करत अधिकारी-कर्मचारी आणि कामगार यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या कामाची चर्चा करून 50 हजार वृक्षांची लागवड करण्याचे आदेशही त्यांनी दिले. सामाजिक वनीकरण व व्हीएसटीएफ(व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन) या संस्थेच्या माध्यमातून खाम नदीवर वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. 25 जानेवारी 2019 पासून ते आज पर्यंत कमी कालावधीमध्ये खाम नदी चा कायापालट करून पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. प्रत्येक शनिवारी महानगरपालिका, स्मार्ट सिटी, इको सत्व, छावणी परिषद, व्हॅरॅक, विविध स्वयंसेवी संस्था, आणि लोकसहभागातून हे शक्य झाले आहे.

त्यांच्यासोबत चिरंजीव देवमान पाण्डेय हे होते.यावेळी कर्मचारी कामगार त्यांच्यासह छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, जिल्हा उत्खनन अधिकारी अतुल दौंड, मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, देविदास पंडित,एम.के. फालक,बी.डी. फड, सामाजिक वनीकरण अधिकारी गायकवाड,स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान ,विशाल खरात यांच्याशी चर्चा करून विकास कामाचा आढावा घेतला व दुसऱ्या टप्प्यातील कामाची डीपीआर नुसार चर्चा केली. नुकतेच औरंगाबाद शहराला केंद्र सरकारचा सायकल फॉर चेंज पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकांनी सायकलवर बसून नागरिकांना आणि खाम नदीला भेट दिली. या माध्यमातून सायकलचा वापर करण्याचा संदेश देऊन पर्यावरण, प्रदूषण व स्वास्थ्य,आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक पाण्डेय यांनी केले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार गुणपत्रिका

SSC student

औरंगाबाद | राज्य शालांत परीक्षा म्हणजे दहावीचा निकाल जाहीर होऊन पंधरा दिवस उलटले असले, तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना इतर प्रवेशासाठी अडचणी येत होत्या. परंतु, येत्या नऊ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना शाळामार्फत गुणपत्रिका देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. यंदा कोरोनामुळे शासनाने राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द केली होती. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार १६ जुलैला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत शाळांमार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाते. परंतु, यंदा दहावीचा निकाल जाहीर होऊनही १५ दिवस उलटले, तरीही अद्याप गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी-पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या दहावीच्या गुणपत्रिकांचे छपाईचे काम वेगात होत असून, ते अंतिम टप्प्यात आहे. गुणपत्रिका विभागीय मंडळाकडून शाळांना वितरित करण्यासाठी सात आणि नऊ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे. तसेच प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन जादा वितरण केंद्रे तयार करणे, वितरण केंद्रावर खिडक्यांची संख्या वाढविण्यात येतील. संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना नऊ ऑगस्ट दुपारी तीन वाजल्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून गुणपत्रिकांचे वितरण करावे, अशी सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

गुणपत्रिका न मिळाल्याने खालील क्षेत्रात प्रवेशात अडसर –
– आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; परंतु पुढील प्रवेश प्रक्रिया दहावीची गुणपत्रिका मिळाल्यानंतर
– अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रवेश अर्ज भरताना मूळ गुणपत्रिकेअभावी अडथळा
– अकरावीसाठी ‘सीईटी’ नंतर होणार असली तरी त्याव्यतिरिक्त दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबली जाण्याची शक्यता

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचे थोबाड फोडू; शिवसेनेचा प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेळ आली तर आम्ही शिवसेना भवन देखील फोडू अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना आता शिवसेनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी कडक शब्दात प्रसाद लाड यांचा समाचार घेतला आहे. तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील अस प्रत्युत्तर राजन साळवी यांनी दिले.

आधी आमदारकीचा राजीनामा दे कारण शिवसेनेच्या मतांवरच तू आमदार झालाय. जर हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीला समोर जा मग बघ शिवसैनिक तुझं कसं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील अशा शब्दात आमदार राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केलाय.

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचे थोबाड फोडू,’ असं साळवी यांनी म्हटलं आहे. ‘शिवसेना भवन’ला हात लावणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोप्पं आहे असं काही भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे,’ अशी बोचरी टीकाही साळवी यांनी केली आहे.

प्रसाद लाड यांची कोलांटीउडी-

दरम्यान शिवसेना भवन फोडू अस मी म्हणलंच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला अस म्हणत प्रसाद लाड यांनी पलटी मारली. शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही असे स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिले.

सुखद ! जायकवाडी धरणातील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढला

jayakwadi damn

औरंगाबाद | शनिवारी जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेले पाणी दाखल झाले आहे. यामुळे जलसाठा 38.35 टक्के एवढा झाला आहे. पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यातील पाण्याचे आगमन झाल्यामुळे जायकवाडी परिसरात आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

‘नाशिक जिल्ह्यातील ज्या धरणात प्रचलन आराखड्यापेक्षा जास्त जलसाठा झाला अशा धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात नाशिकच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे असे दगडी धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणामध्ये करंजवण 22.14, वाघाड 47.52,ओझरखेड 25.77, गंगापूर 76.96,गौतमी 56.16, पालखेड 55.76, कश्यपी 47.85, कडवा 61.2, दारणा 76.39, भावली 100, मुकणे 49.21, नांदूर मधमे्श्वर वेअर 96.50, भंडारदरा 82.39, निळवंडे 43.75, मुळा 50, पुणेगाव 7.24, तीसगाव 0.50, वालदेवी 100,आढळा 43.28, वाकी 40.12, भाम 76.42, आळंदी 70.47,आणि भोजापूर 14.98 टक्के एवढा जलसाठा आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आले असल्यामुळे जायकवाडीत येणारी आवक घटत असल्याचे दिसून आले. शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गंगापूर धरणातून 2090 होणारा विसर्ग 524 क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला. दारणातून 5540 होणारा विसर्ग 3120 क्युसेक्स व नांदूर मधमे्श्वर मधून गोदावरी पात्रात होणारा 9667 विसर्ग 5778 क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक घटणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे व बंडू अंधारे यांनी सांगितले.

दिलासादायक : सातारा जिल्ह्यात नवे 675 कोरोनाबाधित तर पाॅझिटीव्ह रेट 5.8 टक्के

Satara corona patient

सातारा | सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 675 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 866 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 577 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 5. 8 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 351 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 19 हजार 684 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 5 हजार 518 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 297 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 16 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये पाॅझिटीव्ह रेट कमी आले आहे. सातारा जिल्ह्यात कराड, वाई, सातारा व फलटण शहरात आॅनलाईन बुकींग करून लसीकरण करण्यात येत आहे. मात्र याठिकाणीच लशी कमी प्रमाणात येत आहेत. तसेच लसीकरणासाठी नोंद करत आहेत. लसीकरण नोंदणी लसी कमी असल्याने अवघ्या काही मिनिटांतच बुकींग फुल्ल होत आहे.

फ्रेंडशिप बॅंड द्या म्हणत दुकानात गेले अन् सोन्याची साखळी हिसकावून पसार झाले

Theif

औरंगाबाद| एका जनरल स्टोअरवर ५०० रुपयांच्या नोटेचे सुट्टे पैसे मागण्यासाठी दोन युवक आले होते. त्यानंतर १५ मिनिटांनी परत येत त्यांनी फ्रेंडशिप बेल्टची मागणी केली. हा फ्रेंडशिप बेल्ट देतानाच वृद्धेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची दीड तोळे वजन असलेली सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची फिल्मी स्टाईल घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अरिहंतनगरमध्ये घडली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील अरिहंतनगर येथे अरिहंत जनरल स्टोअर्स दुकान आहे. या दुकानात चंपाबाई पूनमचंद पाटणी (वय ७५, नाथनगर, अरिहंतनगर) दुपारी तीन वाजता बसल्या होत्या. दुकानातील नातेवाईक जेवणासाठी घरी गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. ३ वाजून १५ मिनिटांनी दोघेजण काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून किराणा दुकानात आले. त्यांनी ५०० रुपयांचे सुटे पैसे मागितले. दुकानातील चंपाबाई यांनी सुटे पैसे नसल्याचे सांगितल्यामुळे ते निघून गेले. त्यानंतर १५ मिनिटांनी ते दोघे परत दुकानात आले. त्यांनी फ्रेंडशिप बेल्ट आहेत का? असे विचारले. तेव्हा दोघांपैकी एकजण दुचाकीवर जाऊन बसला. दुसरा फ्रेंडशिप बेल्ट कापून देत असलेल्या वृद्ध महिलेकडे पाहत होता. फ्रेंडशिप बेल्ट घेऊन महिला काउंटरवर येताच तयारीत असलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या वृद्धेने तीन मिनिटांनंतर आरडाओरड केली. तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पोबारा केला होता.

या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना देताच निरीक्षक संतोष पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही धाव घेत परिसराची पाहणी केली. या प्रकरणी चंपाबाई पाटणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर करीत आहेत.

‘अच्छे दिन’चा ऊर्जावान नारा देऊनही आज देशभरात गरिबी व भिकारीच; संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातून देशातील गरीबी आणि भिकारी यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला फटकारले आहे. देशात गेल्या 50 वर्षांत गरिबी हटली नाही तर 7 वर्षात अच्छे दिन देखील आले नाहीत अस म्हणत त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला.

हिंदुस्थानसारख्या देशात गरिबी आणि भिकारयांची पैदाइश का होत आहे? गेल्या पन्नास वर्षांपासून प्रत्येक सरकार गरिबी हटावांचे नारे देत निवडणुका लढवीत आहे. मोदी यांनी तर गरिबी निर्मुलनासाठी प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख टाकून घराघरांत सोन्याचा धूर काढण्याचीच घोषणा केली होती. ‘गरिबी हटावांची खिल्ली उडवत ‘अच्छे दिन आयेगे’ चा ऊर्जावान नारा देऊनही आज देशभरात गरिबी व भिकारी आहेत असे राऊतांनी म्हंटल.

देशात भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे व हा एक सामाजिक विषय म्हणून पाहायला हवा. आपल्या देशात भिकाऱ्यांची नक्की संख्या किती? मार्च 2021 च्या सरकारी आकडेवारीनुसार देशात भिकाऱ्यांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. म्हणजे नक्की किती? हा गोंधळच आहे.

एकेकाळचा धनाढ्य विजय मल्ल्या यास कोर्टाने दिवाळखोर जाहीर केले. म्हणून तोसुद्धा कंगाल आणि भिकारीच झाला. मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्या बाबतीत तेच म्हणायला हवे. देशात श्रीमंत भिकाऱ्यांचीच संख्या वाढते आहे. हजारो कोटींची सरकारी कर्जे बुडवून हे श्रीमंत स्वतःस दिवाळखोर म्हणून जाहीर करतात व पुन्हा त्याच श्रीमंती तोऱ्यात जगतात. या भिकाऱ्यांचे काय करायचे? हा प्रश्नच आहे. आपल्या सर्वच धार्मिक स्थळी काय दिसते? गरीब प्रार्थनास्थळांबाहेर भीक मागतो आणि श्रीमंत आत उभा राहून भीक मागत असतो, पण देव श्रीमंत भिकाऱ्यांनाच प्रसन्न होतो! असे संजय राऊत यांनी म्हंटल.

पेट्रोल-डिझेलच्या वाहनांपेक्षा नागरिकांचा ई-वाहनांकडे वाढतोय कल

औरंगाबाद| सध्या पेट्रोलने शंभरीपार केली आहे तर डिझेलचे भावही गगनाला भिडले आहे. यामुळे नागरिकांचा कल आता पेट्रोल डिझेल वाहनांकडे न जाता ई-व्हेइकल्सकडे म्हणजेच इलेक्ट्रिक दुचाकी चारचाकीकडे वाढताना दिसत आहे.

औरंगाबाद मध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109 रुपये डिझेलचा दर प्रति लिटर 98 रुपये एवढा आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसतो. यामुळेच औरंगाबादेत गेल्या ३ वर्षांमध्ये जेवढी ई-वाहने वाढत गेली, त्यापेक्षाही जास्त वाहने ७ महिन्यांतच वाढली आहेत.यामुळे आता ई-चारचाकींची संख्येत वाढ झाली आहे. याला पर्याय म्हणून ई वाहनांना चालना देण्याचे काम सुरु असून औरंगाबादेत देखील या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील वाहनांची संख्या 15 लाख 31 हजारांवर गेली आहे. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत विजेचा कमी खर्च, चार्जिंग करून बिंदास गाडी चालवणे सोपे, आवाजाची पातळी कमी, दुरुस्ती खर्च कमी असल्यामुळे आणि कमी वजन एवढेच नाही तर आरटीओ करात सवलत असल्यामुळे या ई वाहनांकडे नागरिकांचा जास्त कल वाढत आहे.
या ई-वाहनांसाठी करात सवलत मिळते, ज्या ई-वाहनांची गती 25 किलोमीटर प्रति तासापेक्षा कमी आहे अशा वाहनांची नोंदणी करण्याची गरज नसल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.

औरंगाबाद: शहरात 11 आणि ग्रामीण मध्ये 24 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 35 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 11,तर ग्रामीण भागातील 24 रुग्णांचा समावेश असून 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 407 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 611 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 25 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यामध्ये शहरातील 7 आणि ग्रामीण मधील 18 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील

भारतनगर 1,देवडी बाजार 1,बीड बायपास 3, इतर 6 रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागात औरंगाबाद 2, कन्नड 1, गंगापूर 4, पैठण 8, वैजापूर 9 येथील रुग्ण आढळले आहे.वैजापूर येथील 63 वर्षीय महिलेचा त्याचबरोबर कन्नड येथील 50 वर्षीय एका पुरुषाचा, 45 वर्षीय पुरुषाचा सिल्लोड येथे मृत्यू झाला आहे.